नागपूर : देशभरात रस्ते विकासाचे काम जोमात सुरू असताना, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केले आहेत. उड्डाणपूल, भुयारी मार्ग (अंडरपास), आणि राष्ट्रीय महामार्गांच्या निर्मितीत त्यांनी मोठे योगदान दिले आहे. विदर्भ आणि विशेषतः नागपूर परिसरातही त्यांनी अनेक महामार्ग प्रकल्प हाती घेतले, आणि काही पूर्णही केले आहेत.
तथापि, नागपूर-नागभीड राष्ट्रीय महामार्गाचा प्रकल्प मात्र अद्याप पूर्णत्वास गेलेला नाही. हा मार्ग चंद्रपूर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असूनही त्याचे काम रखडले आहे. या रखडण्यामागे उमरेड करायला व्याघ्र प्रकल्प, वन्य प्राण्यांचे भ्रमण मार्ग, रस्त्यासाठी वृक्षतोड, पर्यावरणीय परवानग्यांशी संबंधित अडचणी असल्याचे सांगितले जाते.
स्थानिक नागरिक आणि प्रवासी यांना या रखडलेल्या प्रकल्पामुळे त्रास सहन करावा लागत असून, अपघातांचाही धोका वाढला आहे. नागपूर-नागभीड मार्गाची लवकरात लवकर पुनर्बांधणी पूर्ण व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
नागपूर जिल्ह्याला गडचिरोली आणि चंद्रपूरसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याशी जोडणारा नागपूर-नागभीड मार्ग आजही अरुंद, धोकादायक आहे. हा महामार्ग चारपदरी का होत नाही, असा सवाल नागरिक, सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधींनी केला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३डी अंतर्गत येणाऱ्या उमरेड-नागभीड रस्त्यासाठी केंद्र सरकारने १,१३५ कोटी निधी मंजूर केला आहे. तरीदेखील, जंगल असल्याचे सांगून काम अडवून ठेवण्यात आले आहे.
नागपूर ते जबलपूर महामार्ग पेंचसारख्या घनदाट जंगलातून जाऊ शकतो, तिथे चौपदरी रस्ता शक्य होतो तर नागपूर-नागभीड रस्ता त्याला अपवाद कसा, असा नागरिकांचा सवाल आहे. ज्या भागातून वन्यजीव मार्ग जातो तिथे रेल्वेकडून अंडरपास, ओव्हरपास किंवा वाइल्डलाइफ क्रॉसिंग तयार केले जाते. इतवारी ते नागभीड ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. उमरेड ते नागभीड रेल्वेमार्ग बांधणीत काही ठिकाणी रेल्वे मार्ग उभारण्यात येत आहे. मग, महामार्ग प्रकल्पातही हाच उपाय का वापरला जात नाही, असा नागरिकांचा प्रश्न आहे.
सध्या या मार्गावर खड्डे, अरुंद वळणांमुळे अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अलीकडेच भिवापूरजवळ चारचाकी वाहन नदीत पडून चालकाचा मृत्यू झाला. याआधीही अनेक अपघात झाले. रेल्वेप्रमाणे अंडरपासचा पर्याय वापरून, वन्यजीवांचे रक्षण करत रस्ता विकसित करता येतो. केंद्र व राज्य शासनाने तात्काळ पावले उचलून काम सुरू करावे, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
‘गडकरींनी लक्ष घालावे’
या मार्गावर अरुंद, धोकादायक वळणे आहेत. लोकांचे प्राण जात आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना या विषयाला प्राधान्य देऊन हा रस्ता चार पदरी करावा, अशी विनंती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.