प्रबोध देशपांडे
अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचितकडून स्वत:ची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे परंपरेनुसार वंचितचे ॲड. प्रकाश आंबेडकर व भाजपचे अनुप धोत्रे यांच्यात लढत होणार आहे. ‘वंचित’ आणि ‘मविआ’तील आघाडीची शक्यता मावळल्याने आता काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष राहणार आहे. आतापर्यंत राज्यातील दोन मतदारसंघात ‘वंचित’ने काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे काँग्रेसवर नैतिक दबाव असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघात जातीय राजकारण व मतविभाजनाचे प्रभावी समीकरण आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळावर निवडणूक लढणे भाजपच्या पथ्यावर पडत गेले. तिरंगी लढतीत नेहमीच भाजपची सरशी झाली. परिणामी, गत काही वर्षांमध्ये काँग्रेसपुढे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील अनेक मतदारसंघात वंचित फॅक्टर प्रभावी असल्याचे मतविभाजनाचा आघाडीच्या उमेदवारांना फटका बसत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे दर लोकसभा निवडणुकीपूर्वी ॲड. प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चेचे सत्र चालते. मात्र, अंतिम क्षणापर्यंत एकमत होत नाही. हेच चित्र या निवडणुकीत सुद्धा दिसून येत आहे. ॲड.आंबेडकर यांना ‘मविआ’मध्ये घेण्यावरून गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच होते.
आणखी वाचा-आधी उमेदवारी… नंतर पक्षप्रवेश! नवनीत राणांच्या भाजप प्रवेशाची चित्तरकथा…
ॲड.आंबेडकरांनीही ‘मविआ’मध्ये येण्याची तयारी दर्शवून काही मुद्दे मांडले. जागा वाटवाचा तिढा वाढला. त्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. आता ॲड. प्रकाश आंबेडकरांनी वंचित आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामुळे ‘मविआ’ व वंचितमध्ये आघाडी होण्याची शक्यता मावळली आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसपुढे ‘गुगली’ टाकून राज्यातील त्यांच्या सात उमेदवारांना पाठिंबा देण्याचा प्रस्ताव काँग्रेस अध्यक्षांना पाठवला. कोल्हापूर येथून काँग्रेसने शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर केल्यावर ॲड. प्रकाश आंबेडकरांनी त्यांना वंचित आघाडीचा पाठिंबा दिला आहे, तर आज वंचितने नागपूरमधील विकास ठाकरे यांना सुद्धा पाठिंबा दिला. आतापर्यंत वंचितने काँग्रेसच्या दोन उमेदवारांना बिनशर्त समर्थन दिले. पाठिंब्यासंदर्भात काँग्रेसकडून अद्याप वंचितशी कुठलाही पत्रव्यवहार झालेला नाही. वंचितकडून एकतर्फी पाठिंबा दिला जात असल्याने काँग्रेसवर नैतिक दबाव वाढत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
आणखी वाचा-काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खासदारकीची उमेदवारी का नाकारली?
अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपविरूद्ध वंचित अशी लढत होणार आहे. गेल्या चार निवडणुकांमध्ये काँग्रेस व वंचित स्वतंत्र लढल्याने अकोल्यात तिरंगी लढत झाली. या तिरंगी लढतीत भाजपने नेहमीच वर्चस्व राखले. यावेळी ॲड. आंबेडकरांनी काँग्रेस उमेदवारांना पाठिंब्याची खेळी खेळली आहे. आता काँग्रेसच्या कोर्टात चेंडू असून अकोल्यात ॲड. प्रकाश आंबेडकरांपुढे काँग्रेस उमेदवार देणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष राहणार आहे.
लोकसभा निवडणुकीसोबतच अकोला पश्चिमची पोटनिवडणूक जाहीर झाली होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पोटनिवडणुकीची अधिसूचना रद्द करण्याचा आदेश दिला. पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने साजिद खान पठाण यांना उमेदवारी दिली होती. या माध्यमातून मुस्लीम धर्माला प्रतिनिधित्व दिले होते. आता ती निवडणूकच रद्द झाल्याने समीकरण बदलले आहे. काँग्रेसला त्याचा विचार करावा लागणार आहे.