यवतमाळ : राज्य परिवहन महामंडळाच्या दारव्हा आगारातील एका महिला लिपिकाच्या तक्रारीवरून आगार व्यवस्थापक नितीन उजवणे (४५, रा. नवेगावबांध, जिल्हा गोंदिया, हल्ली मुक्काम नातूवाडी, दारव्हा) यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना अटक करून न्यायालयात दाखल केले असता, पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या कारवाईने खळबळ उडाली आहे.
महिला लिपीक कर्मचाऱ्याने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, आगार व्यवस्थापक उजवणे गेल्या आठ महिन्यांपासून सतत त्रास देत असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. तक्रारीनुसार, उजवणे हे कार्यालयातील कामकाजात हेतूपुरस्सर त्या महिला कर्मचाऱ्यालाच सहभागी करून घेत होते. याबाबत महिला लिपीकाने नाराजी व्यक्त केली असता, “जोपर्यंत माझ्या म्हणण्यानुसार वागत नाही, तोपर्यंत त्रास सहन करावा लागेल,” असे व्यवस्थापकांनी धमकीच्या स्वरात सांगितले होते.
तसेच, दस्तऐवज स्वाक्षरीसाठी देताना त्यांनी वाईट हेतूने स्पर्श करण्याचा प्रयत्न, तसेच द्विअर्थी बोलणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे खोटी माहिती देऊन बदनामी करण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
महिला कर्मचाऱ्याने यापूर्वीही लेखी व मौखिक तक्रारी केल्या होत्या, परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कारवाईअभावी उजवणेची हिंमत वाढली. घटनेच्या दिवशी गुरुवारी, पहाटे साडेपाच वाजता महिला कर्मचारी नातूवाडी येथील घरी पायदळ निघाली असता, नितीन उजवणे दुचाकीवरून मागून आले आणि अश्लील हातवारे करत त्रास दिला. महिला कर्मचाऱ्याने आरडाओरडा केल्यानंतर तेथून उजवणे पळून गेले, असे तक्रारीत म्हटले आहे.
या घटनेनंतर दारव्हा पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा नोंदवून आरोपी उजवणे याला अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई ठाणेदार मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर कायंदे करीत आहेत.
दारव्हा आगार व्यवस्थापक उजवणे यांच्याविरोधात तक्रार दाखल होताच, एसटी महामंडळातील अनेक कर्मचारी पोलिसांकडे धावले. त्यांनीही आगारातील कारभार व वादग्रस्त वर्तनाबाबत माहिती दिली. अनेक चालक-वाहकांनी उजवणे यांच्या विरोधात तक्रारींचा पाढा वाचला.
महिलांच्या सामूहिक तक्रारीनंतरही कारवाई नाही!
उजवणे यांच्याविरोधात यापूर्वीच सात महिला कर्मचाऱ्यांनी विभाग नियंत्रकांकडे सामूहिक तक्रार केली होती. तसेच काही चालक-वाहकांनीही त्यांच्या वर्तनाविषयी आक्षेप नोंदवले होते. तरीदेखील, वरिष्ठांकडून कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांचे धाडस वाढले, अशी चर्चा आगारात सुरू आहे. तक्रारी असूनही उजवणे यांना ‘अभय’ कुणाचे? हा प्रश्न कर्मचाऱ्यांमध्ये उपस्थित केला जात आहे.
