अन्न आणि औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा उत्पादक, वितरकांना इशारा

नाशिक : करोनाला प्रतिबंध करण्यासाठी मास्क, सॅनिटायझरची मागणी वाढत आहे. नाशिकमध्ये ही मागणी ३० टक्क्य़ांनी वाढली. सॅनिटायझरची जादा दरात विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत. वितरक, उत्पादकांनी चांगल्या दर्जाचे, ठरवून दिलेल्या किंमतीत सॅनिटायझरची विक्री करावी अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न-औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिला.

सोमवारी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित जिल्ह्यातील मास्क, सॅनिटायझरचे मुख्य वितरक आणि उत्पादकांच्या बैठकीत ते बोलत होते. दोन दिवसांपूर्वी शहरात बनावट सॅनिटायझरची विक्री होत असल्याचा प्रकार उघड झाला होता. भरारी पथकाने दोन घाऊक विक्रेत्यांवर छापा टाकून एक लाखहून अधिकचे बनावट सॅनिटायझर जप्त केले होते. या पार्श्वभूमीवर, झालेल्या बैठकीत जिल्ह्य़ात उपलब्ध साठा, वाढती मागणी यांचा आढावा त्यांनी घेतला. नागरिकांना सॅनिटायझरचा तातडीने पुरवठा होण्यासाठी उत्पादन कंपन्यांनी स्थानिक पातळीवर सॅनिटायझरची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करावे. त्यासाठी लागणाऱ्या परवानग्या, कच्चा मालाचा पुरवठा करण्यास शासन मदत करण्यास तयार असल्याचे त्यांनी सूचित केले. सॅनिटायझर उत्पादनास कॉस्मेटिकच्या माध्यमातून परवानगी मिळावी या उत्पादक, वितरकांच्या मागणीवर मंत्रिमंडळ स्तरावर निर्णय घेण्यात येईल तसेच सॅनिटायझरच्या उत्पादन वाढीसाठी देण्यात येणाऱ्या परवानग्यांना करोनाच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी फाटा देऊन तातडीने परवानग्या देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सॅनिटायझरचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात वाढविण्याची गरज आहे. जेणेकरून त्याचा तुटवडा भासू नये अशी सूचना त्यांनी वितरक, उत्पादकांनी केली. अल्कोहोल विरहीत सॅनिटायझर निर्मितीसाठी काही कंपन्यांनी तयारी दाखविली आहे. परंतु अल्कोहोल विरहीत सॅनिटायझर किती परिणामकारक आहे याची खात्री करून परवानगी दिली जाईल. राज्य उत्पादन शुल्क विभाग सॅनिटायझरच्या निर्मितीसाठी लागणारे अल्कोहोल तातडीने पुरवणार असल्याचे ते म्हणाले. बैठकीस वितरक, उत्पादक यांच्या शंकांचे निसरन करण्यात आले. यावेळी मिलिंद कटारिया, रमेश कांकरिया, अमित बच्छाव, रिजवान शेख, सुरेश पाटील राजेंद्र धामणे आदी मास्क, सॅनिटायझर वितरक, उत्पादक उपस्थित होते.

गुटखा किंगमार्फत अवैध विक्रीची तक्रार

गुटखा किंग मार्फत मास्क, सॅनिटायझरची अवैध पध्दतीने विक्री केली जात असल्याची तक्रार औषध विक्रेता संघटनेने केली. अन्न-औषध प्रशासन विभागाने संबंधितांवर कारवाई करावी, असे आदेश डॉ. शिंगणे यांनी दिले. करोनाबाबत समाज माध्यमांवर पसरणाऱ्या कोणत्याही भूलथापांना नागरिकांनी बळी पडू नये, करोना आजाराच्या बचावासाठी जनजागृती करणे आवश्यक असून प्रत्येकाने आपल्या स्तरावर नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश पोहचविण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले.

शहरातील सर्व उद्याने बंद

महापालिकेची सर्व उद्याने ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात सर्व उद्यानांवर फलक लावले जातील. सर्व उद्याने पूर्ण वेळेसाठी बंद राहणार आहेत. उद्यानातील दैनंदिन देखभाल विषयक कामे सुरू राहतील. स्वच्छता, साफसफाईची कामे सुरू आहे. सफाई कामगारांची संख्या कमी असल्याने याबाबत आरोग्य विभागाने नियोजन करावे, असे महापौरांनी सूचित केले. उघडय़ावर कचरा टाकणारे, थुंकणाऱ्यांविरुध्द काही वर्षांपूर्वी कारवाई केली जात होती. आता ही कारवाई थांबलेली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचना प्रशासनाला दिली जाईल, असे कुलकर्णी यांनी सांगितले.