पालकमंत्री छगन भुजबळ यांचे सतर्कता बाळगण्याचे आवाहन

नाशिक : जिल्ह्यत करोनाच्या दुसऱ्या लाटेचे भय संपत आले असताना डेल्टा प्लस या विषाणूच्या स्वरूपात करोनाचे नवीन आव्हान उभे ठाकले आहे. करोनाची संभाव्य तिसरी लाट आणि नवीन डेल्टा प्लस या विषाणूचा संसर्ग पसरण्याची क्षमता जास्त असल्याने नागरिकांनी स्वत: काळजी घेऊन करोना त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

गुरुवारी पालकमंत्री भुजबळ यांनी मुंबईहून दूरदृश्य प्रणालीद्वारे नाशिक शहर आणि जिल्ह्य़ातील करोना आणि करोना पश्चात आजारांबाबतची सद्यस्थितीची माहिती घेतली. नागरिकांनी विनाकारण गर्दी करणे टाळावे, करोना विषाणूपासून बचावासाठी मुखपट्टीचा नियमित वापर, सुरक्षित अंतर आणि वैयक्तिक स्वच्छता या त्रिसूत्रीचा नियमितपणे अंगीकार करावा, जेणेकरून डेल्टा प्लस या नव्याने येणाऱ्या विषाणूला आपण सर्व एकत्रितपणे तोंड देऊ  शकू  असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त के ला.

प्राणवायु साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावा यासाठी जिल्ह्यत द्रव स्वरूपातील प्राणवायू प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करावा, रुग्णालयात खाटांची उपलब्धता, शस्त्रक्रि या कक्ष, आवश्यक औषधसाठा या गोष्टींकडे लक्ष देवून त्यांची तातडीने पूर्तता होण्यासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात यावे, आदी सूचनाही भुजबळ यांनी के ल्या.

दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी करोना सद्यस्थिती व करोना पश्चात होणाऱ्या म्युकरमायकोसिस याआजाराबाबत सविस्तर माहिती दिली. पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय,  महानगरपालिका आयुक्त कै लास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड  यांनीही मनोगत या वेळी व्यक्त के ले.

जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त दुष्यंत भामरे, मालेगावचे आयुक्त भालचंद्र गोसावी, नाशिकचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण अष्टीकर, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, म्युकरमायकोसिस कृती दलाचे डॉ. संजय गांगुर्डे हेही आपल्या कार्यालयातून दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते.