नाशिक : ठाकरे सरकारच्या हलगर्जीपणामुळे मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली असून ठाकरे आणि अशोक चव्हाण यांनी मराठा समाजाची फसवणूककेली आहे. आरक्षणाबाबत त्यांच्या मनात काळेबेरे असल्याचा आरोप शिवसंग्रामचे अध्यक्ष तथा मराठा आरक्षण समितीचे सदस्य विनायक मेटे यांनी केला आहे.

येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी मेटे यांनी संवाद साधला. राज्यात मराठा आरक्षणावर लढणाऱ्या नऊ संघटना एकत्र येऊन मराठा समन्वय समिती स्थापन केली आहे. या समितीच्या कामकाजाची पुढील दिशा काय असेल, याविषयी मेटे यांनी माहिती दिली. सरकारच्या हलगर्जीपणामुळे आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने ६ ऑगस्टपासून राज्यात आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही मेटे यांनी दिला. अशोक चव्हाण आरक्षणाचा अभ्यास करत नाहीत. ते आरक्षण विषयावर गंभीर नाहीत. निष्क्रिय असलेल्या अशोक चव्हाण यांना जबाबदारीतून मुक्त करून ही धुरा एकनाथ शिंदे यांच्याकडे द्यावी, अशी मागणी मेटे यांनी केली. मराठा आरक्षण विषयात अनुभवी वकिलांना बाजूला करण्यात येत असून सरकारमधील काही लोक विरोधातील लोकांना मदत करत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाबाबत दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्यात यावे, मराठा आरक्षणाबाबत देण्यात आलेले आव्हान घटनेशी संबंधित आहे. केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण दिले आहे. तसेच शासनाने राज्यात ६० टक्के आरक्षण करण्यासाठी सर्व याचिका एकत्र करून ही प्रकरणे घटनापीठाकडे पाठविण्यात यावीत, असे मेटे यांनी सांगितले.दरम्यान, मराठा समन्वय समिती आरक्षणासाठी आग्रही असून ६ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी, प्रांत, तहसील कार्यालयांमध्ये निवेदन देण्यात येईल, असे मेटे म्हणाले.