बच्चू कडू यांच्या उपस्थितीत रविवारी परिषद

नाशिक : प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आमदार ओमप्रकाश (बच्चू) कडू यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार, २४ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता सिन्नर फाटा परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांदा परिषद आयोजित करण्यात आली आहे.

काही महिन्यांपासून कांद्याला योग्य दर मिळत नसल्याने उत्पादक हवालदिल झाले आहेत. यासंदर्भात प्रहारच्या वतीने डिसेंबर महिन्यात चांदवड येथे आंदोलन करून  सरकारचे या विषयाकडे लक्ष वेधण्यात आले. सहकार मंत्र्यांकडे शिष्टमंडळाची बैठकही झाली, तरीही सरकारने हमी भावासंदर्भात कोणतीही कार्यवाही केलेली नाही. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येवला येथे जानेवारीत कांदा उत्पादकांच्या उपस्थितीत संवाद सभा झाली. सटाणा येथेही कांदा उत्पादकांची सभा झाली. या सभांमध्ये सरकारच्या विरोधात रविवारी राज्यस्तरीय कांदा उत्पादकांची परिषद घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

परिषदेत  सरकारने विक्री झालेल्या कांद्याला दिलेले अनुदान वाढवून २०० ऐवजी ५०० रुपये करावे, कांद्याचा उत्पादन खर्च काढून भाव कायम करावा, जीवनावश्यक वस्तूच्या यादीतून कांदा वगळून प्रस्ताव केंद्राकडे पाठवून हमीभाव कायम करावा, नुकसान झालेल्या उन्हाळ कांद्याचा पंचनामा करून त्या शेतकऱ्याला आश्वासक मदत मिळावी, हजारो हेक्टर पोळ कांदा पाण्याअभावी जळण्याच्या मार्गावर असलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी अनुदानात्मक रक्कम ठरवून सावरण्याची जबाबदारी उचलावी आदी मागण्या करण्यात येणार आहेत. कांदा उत्पादकांनी परिषदेस उपस्थित रहावे, असे आवाहन प्रहारच्या वतीने करण्यात आले आहे.