पारंपरिक बैठकीतील मूर्तीना भक्तांची मोठी पसंती

‘भाव तसा देव’ या उक्तीनुसार बाप्पाला वेगवेगळ्या रूपात अनुभवण्यासाठी भाविक उत्सुक असतात. यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा प्रशासनाचा आग्रह कायम असला तरी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीनी बाजारपेठ सजली आहे. बाप्पाप्रेमींनींही घरातील आरास, जागा, मखराची उंची, खिशाचा अंदाज घेत मूर्ती खरेदी करण्याकडे कल ठेवला आहे. विशेषत पारंपरिक बैठकीतील मूर्तीना भक्तांची मागणी आहे.

गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्याच्या  स्वागतासाठी सार्वजनिक गणेश मंडळांतर्फे जय्यत तयारी सुरु आहे. भक्तांना त्यांच्या आवडत्या रूपातील बाप्पाची मूर्ती उपलब्ध व्हावी, यासाठी शहर परिसरात मुख्य बाजारपेठेसह ठिकठिकाणी गणेश मूर्ती विक्री केंद्रे सुरू झाली आहेत.  काही वर्षांपासून पर्यावरण संवर्धनासाठी शाडू मातीच्या मूर्ती वापरण्याविषयी प्रबोधन होत आहे. या प्रबोधनाला ग्राहकांकडून काही अंशी प्रतिसाद लाभत असला तरी  प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीकडे असणारा भाविकांचा कल कायम आहे.

शाडू मातीच्या मूर्ती पेण, पनवेल, रायगड परिसरासह जिल्ह्य़ातील काही ठिकाणाहून बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. साधारणत तीनशे रुपयांपासून पुढे या मूर्तीची विक्री होत आहे.

ग्राहकांकडून याबाबत विचारणा होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. बाजारपेठेत लालबागचा राजा, दगडुशेठ हलवाई, सिध्दी विनायक, कमल गणेश, पेशवा, शेषधारी, बालगणेश, पगडी गणेश, लालबागजा राजा, बालाजी अश्या बाप्पांच्या विविध आकर्षक मूर्ती ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत गणेश मूर्तीच्या किमतीत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

राज्यात विविध ठिकाणी लागू झालेल्या स्थानिक संस्था कराचा अप्रत्यक्ष फटका या व्यवसायाला बसला आहे. मूर्तीच्या किमतीत वाढ होण्यामागे ते महत्वाचे कारण असल्याचे सोमवंशी यांनी सांगितले. मूर्तीवर कर लागू नसला तरी त्या तयार करण्यासाठी लागणारी माती, कच्चा माल, इतर साहित्य यावरील करात वाढ झाली आहे. तसेच मजुरी, वाहतूक खर्चात वाढ झाल्याने मूर्तीची किंमत वाढल्याचे विक्रेते सांगतात.

नाशिक, पेण, सावंतवाडी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अमरावती, नागपूर, अहमदनगर या भागातून मूर्ती शहरातील बाजारपेठेत आल्या आहेत. सालकृंत गणेश मूर्ती भाविकांच्या मनावर मोहिनी घालत असली तरी तीची किंमत प्रत्येकाच्या खिशाला परवडेल अशी नाही.

यावर उपाय म्हणून काही ठिकाणी गणेशमूर्तीना कुंदन, ‘आय लॅशेस’, ‘कुंदन वर्क’ याचीही खास सजावट करून देण्यात येत आहे. याकरिता आपल्याला अपेक्षित सजावटीप्रमाणे त्याची किंमत आकारली जाते, तर काही ठिकाणी मूर्तीची किंमत पहाता ती मोफतही करून दिली जात आहे. बहुतांश कला केंद्रामध्ये मूर्तीची आगाऊ नोंदणी पूर्ण होत आली आहे.

शाडूच्या मूर्ती महाग म्हणून ‘पीओपी’ला प्राधान्य

बाजारपेठेत ‘मार्बल फर्निचर’, ‘टेक्चर’ हा मूर्तीमधील नवीन प्रकार दाखल झाला असून यासाठी जादा पैसेही मोजावे लागत आहेत. साधारणत: अडीच हजारापुढे या मूर्तीची विक्री होत आहे. ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या (पीओपी) तुलनेत शाडू मातीच्या मूर्तीना ग्राहकांचा प्रतिसाद लाभत नसल्याचे त्यांनी सांगितले. शाडू मातीच्या मूर्ती तुलनेत महाग असतात. पर्यावरणस्नेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याची बहुतेकांची इच्छा असली तरी आर्थिक बाबींमुळे ‘पीओपी’च्या मूर्तींना पसंती दिली जाते, असे विक्रेत्या सोनाली सोमवंशी यांनी सांगितले. ‘पीओपी’च्या मूर्ती ३५० रुपयांपासून ते २० हजार रुपयांपर्यंत आहेत, तर शाडूमातीच्या मूर्ती ४०० रुपयांपासून आठ ते १० हजारांपर्यंत उपलब्ध आहेत.