धुळे :तांत्रिक काम सुरु असलेले फिडर बंद न करता भलतेच फिडर बंद केल्याने विजेच्या तीव्र धक्क्याने तरुणाचा मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता, उपकार्यकारी अभियंता, लाईनमन आणि ऑपरेटर अशा चार जणांविरुद्ध पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ऑपरेटर आणि लाईनमन यांना अटक करण्यात आली आहे.

धुळे तालुक्यातील वार कुंडाणे येथील आकाश उर्फ विक्की पाटील (२७ वर्षे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. वार येथील मराठी माध्यमिक शाळेजवळ असलेल्या ११ किलोवॅट क्षमतेच्या केंद्रात (गावठाण) रविवारी तांत्रिक बिघाड झाल्याने दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम लाईनमन दीपक चौधरी यांनी स्वतः करणे अपेक्षित होते. परंतु, तसे न करता त्यांनी काम पूर्ण करण्यासाठी आकाश पाटील यांना अनधिकृतपणे बरोबर नेले.

यावेळी वरिष्ठ ऑपरेटर रोहिदास वानखेडे यांनी कार्यालयातून वीज वितरण कंपनीचे वार येथील फिडरवरील वीज प्रवाह खंडित करण्याऐवजी सांजोरी गावच्या फिडरवरील वीज पुरवठा खंडित केला. या चुकीमुळे दुर्दैवी घटना घडली. सहायक अभियंता हेमंत ठाकूर आणि उपकार्यकारी अधिकारी मनोज भावसार यांनी त्यांच्या नियत्रंण आणि अधिपत्याखाली काम करणाऱ्या चौधरी आणि वानखेडे यांच्याकडून अनधिकृतपणे काम करुन घेण्यास प्रेरणा दिल्याचा आरोप आहे.

तांत्रिक कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याने कामाशी संबंधित असलेल्या या सर्व चार जणांनी काळजी घेणे अपेक्षित होते. विजेच्या तीव्र धक्क्याने आकाश पाटील विद्युत खांबावरून खाली पडला. आकाश यास तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान आकाशचा मृत्यू झाला.

यासंदर्भात योगेश पाटील (रा.मुकटी, ता.धुळे) यांनी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन पोलिसांनी वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता, उपकार्यकारी अभियंता, वरिष्ठ ऑपरेटर आणि लाईनमन अशा चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात वरिष्ठ ऑपरेटर आणि वायरमन अशा दोन जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक तथा तपास अधिकारी साईनाथ तळेकर यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्या केंद्रातून वीज प्रवाह बंद करायचा होता, तेथून तो बंद न करता भलत्याच केंद्रातून वीज पुरवठा बंद करण्यात आला. यामुळे ही घटना घडली. –सचिन कापडणीस सहायक निरीक्षक, पश्चिम देवपूर पोलीस ठाणे, धुळे