विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीच्या पहिल्या टप्प्यात विभागातील पाच जिल्ह्यातून एक लाख ९० हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. इच्छुकांनी अधिकाधिक मतदारांच्या नोंदणीवर भर दिल्याने अखेरच्या टप्प्यात अर्जांची संख्या लक्षणिय वाढली. नाशिकच्या तुलनेत अहमदनगरमधून दुप्पट अर्ज आले असून निवडणुकीत त्या भागाचा वरचष्मा राहण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा >>>गिरीश महाजनांकडून जळगाव शहर विकासासाठी निधीच्या फक्त वल्गना;आमदार खडसेंचा हल्लाबोल

मतदार नोंदणीच्या पहिल्या टप्प्यात प्रारंभी फारसा प्रतिसाद मिळाला नाही. प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारी जाहीर न केल्याचा हा परिणाम असल्याचे सांगितले जात होते. अद्यापही राजकीय पक्षांनी अधिकृत उमेदवाराची घोषणा केलेली नाही. नंतर नोंदणीसाठी ऑनलाईन व्यवस्था करण्यात आली. पहिल्या टप्प्यात मतदार नोंदणीची मुदत सात नोव्हेंबरला संपुष्टात आली. तत्पुर्वीच्या दोन दिवसांत एक २० हजारहून अधिक अर्ज पाच जिल्ह्यातून जमा झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

हेही वाचा >>>नाशिक: भंगार व्यवहाराच्या वादातून हवेत गोळीबार; सातपूर-अंबड लिंक रस्त्यावरील घटना

मागील निवडणुकीत मतदारसंघात अडीच लाखहून अधिक मतदार होते. यावेळी पहिला टप्पा संपुष्टात येण्याच्या दोन दिवस आधी विभागात ६० हजारच्या आसपास अर्ज प्राप्त झालेले होते. अखेरच्या दिवसात इच्छुकांनी गठ्ठ्यांनी अर्ज सादर केल्यामुळे ही संख्या एक लाख ८९ हजार ४४४ वर गेली. यात ऑफलाईन पध्दतीने एक लाख ३० हजार १५७ तर ऑनलाईन पध्दतीने ५९ हजार २८७ अर्ज अर्ज प्राप्त झाल्याचे उपायुक्त रमेश काळे यांनी म्हटले आहे. मतदारसंघात अहमदनगरमधून सर्वाधिक अर्ज प्राप्त झाले असून त्या खालोखाल नाशिकचा क्रमांक आहे. धुळे, जळगाव आणि नंदुरबारमध्ये हे प्रमाण बरेच कमी आहे. दुसऱ्या टप्प्यात २३ नोव्हेंबर ते नऊ डिसेंबर २०२२ या कालावधीत पदवीधरांना नोंदणी करता येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्हानिहाय प्राप्त अर्ज
नाशिक – ४१ हजार ४३०
अहमदनगर – ८२ हजार ५८६
धुळे – २० हजार १७८
जळगाव – २६ हजार ९६१
नंदुरबार – १८ हजार २६७