मालेगाव: शहरातील अत्यंत वर्दळीचा भाग असलेल्या सटाणा नाका भागात व्यापाऱ्याच्या घरी शुक्रवारी रात्री सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न झाला. दरोडेखोरांच्या हल्ल्यात तीन जण जखमी झाले असून त्यांना मालेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रसंगावधान दाखवत स्थानिकांनी दोन संशयितांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

इंदिरा नक्षत्र पार्क या इमारतीत वास्तव्यास असलेले अमृत पटेल हे व्यापारी रात्री साडे आठच्या सुमारास दुकान बंद करुन घरी परतले. त्यांच्याकडे पैसे ठेवलेली पिशवी होती. त्यांनी घरात पाय ठेवताच पाठीमागून आलेल्या तिघांनी गावठी बंदुक,चाॅपर आणि चाकूचा धाक दाखवत पटेल यांच्याकडील पैशांची पिशवी हिसकाविण्याचा प्रयत्न केला. यावेळी घरातील अन्य सदस्यांनी प्रतिकार केल्यावर दरोडेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यात स्वत: पटेल आणि अन्य दोन सदस्य असे तिघे जखमी झाले.

हेही वाचा… द्राक्ष उत्पादकाची परप्रांतीय व्यापाऱ्याकडून फसवणूक

पटेल यांच्या कुटूंबातील सदस्यांनी आरडाओरड केल्यावर शेजारी असलेले घरमालक राहुल देवरे आणि चौकात असलेल्या तरुणांनी तेथे धाव घेतली. त्यामुळे घाबरलेल्या दरोडेखोरांनी पळ काढला. काही तरुणांनी पाठलाग करुन दोघांना पकडले.अंधाराचा फायदा घेत एक जण पळून गेला. दरोडेखोरांनी पटेल यांच्यावर पाळत ठेवत दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, छावणी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रघुनाथ शेगर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कबीर सोनवणे (२२), विलास उर्फ बंटी पाटील (२२) अशी पकडण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे असून ते दोघे धुळे येथील रहिवासी आहेत. दोघांना हल्ला व दरोड्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून गावठी बंदूक, चाॅपर जप्त करण्यात आले. फरार झालेल्या तिसऱ्या संशयिताचा पोलीस शोध घेत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी पकडलेल्या दरोडेखोरांना छावणी पोलीस ठाण्यात नेले. तेथे रात्री उशीरापर्यंत नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळी तसेच पोलीस ठाण्यास भेट देत संशयितांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.