जळगाव : मराठाला समाजाला ओबीसी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मुंबईत सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्याचा निर्णय जिल्ह्यातील मराठा समाजाच्या ३० संघटनांनी घेतला आहे. त्यानुसार, बुधवारपासून सुमारे चार हजार कार्यकर्ते रस्ते मार्गे तसेच रेल्वेने पुरेशा शिदोरीसह मुंबईत धडक देणार आहेत.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन छेडले आहे. आझाद मैदानावर सुरू असलेल्या त्यांच्या आंदोलनात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. आंदोलनस्थळी जयघोष, घोषणाबाजी आणि ऐक्याचे दर्शन घडत आहे. समाजाच्या हक्कासाठी लढल्या जाणाऱ्या या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. त्यात उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील मराठा समाज देखील आता मागे राहणार नाही. कारण, सकल मराठा समाजाच्या ३० संघटनांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्याचा निर्धार केला आहे. आणि त्यासाठी मुंबईत धडक देण्यासाठी हालचाली वाढविल्या आहेत.

जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी जळगावमधून बुधवारी सकाळी १० वाजता २०० वाहनांमधून ९०० कार्यकर्ते मुंबईकडे रस्ते मार्गे रवाना होणार आहेत. या व्यतिरिक्त, सुमारे तीन हजार कार्यकर्ते बुधवारपासून शुक्रवारपर्यंत टप्याटप्याने रेल्वेच्या माध्यमातून मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचतील. विशेष म्हणजे सर्व कार्यकर्ते आपल्या सोबत पुरेशी शिदोरी घेऊन जाणार आहेत, अशी माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने पत्रकारांना देण्यात आली. यावेळी लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, उद्योजक प्रा. डी. डी. बच्छाव, शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) जिल्हा प्रमुख कुलभूषण पाटील, छावा मराठा संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी भीमराव मराठे, मराठा सेवा संघाचे सुरेंद्र पाटील, डॉ. राजेश पाटील, राम पवार, आबा कापसे, संतोष पाटील, सुनील गरूड यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी बुधवारी सकाळी १० वाजता सर्व कार्यकर्ते शिवतीर्थ मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जमणार आहे. त्याठिकाणी शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन झाल्यानंतर सर्व गाड्या पारोळा, धुळे, मालेगाव, नाशिकमार्गे मुंबईत आझाद मैदानावर पोहोचतील. दरम्यान, एरंडोलसह पारोळा, धरणगाव, भडगाव, पाचोरा, चाळीसगाव, अमळनेर, चोपडा या तालुक्यातील मराठा सेवा संघासह संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, छावा, बुलंद छावा, सकल मराठा समाजासह ३० संघटनांचे कार्यकर्ते सहभागी होतील.

तीन दिवस पुरणारी शिदोरी सोबत

जळगाव जिल्ह्यातून मुंबईकडे बुधवारी रवाना होणारे मराठा समाजाचे कार्यकर्ते सोबत तीन दिवस सुमारे पाच हजार जणांना पुरेल इतकी शिदोरी सोबत घेऊन जाणार आहेत. त्याकरिता तीन मालमोटारींची व्यवस्था करण्यात आली आहे. साधारणपणे दोन क्विंटल तांदूळ, दीड क्विंटल डाळ, तीन क्विंटल भाकरीचे पीठ, तीन क्विंटल गव्हाचे पीठ, १५ किलो मिरची, दीडशे किलो केळी आणि २० हजार पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांसाठी करण्यात आली आहे.