धुळे – मराठी भाषिक शिक्षिकेचा आणि मराठी भाषेचा अपमान केल्याप्रकरणी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील कर्मचाऱ्याला मारहाण केल्या प्रकरणी शिवसेसैनिकांविरुध्द (उध्दव ठाकरे) गुन्हा दाखल झाला असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. महिला ग्राहकाला शिवीगाळ केल्याप्रकरणी त्याच बँकेच्या व्यवस्थापकासह दोन जणांविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील प्रमोद नगरातील एसबीआय बँकेच्या शाखेत शिक्षिका पद्मा शिंदे (४३, रा. गोकुळ अपार्टमेंट, देवपूर) या गेल्या असता बँक कर्मचारी सदाशिव अजगे (३३, रा.जानकी नगर, वाडीभोकर रोड, देवपूर) यांनी अपमानास्पद वागणूक दिली. मराठी भाषेचा अपमान केल्याची तक्रार शिंदे यांनी ठाकरे गटाकडे केल्यावर जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी आणि महानगरप्रमुख धीरज पाटील यांच्यासह १२ ते १५ शिवसैनिक बँकेत दाखल झाले. त्यांनी अजगेला जाब विचारत त्याच्या कानशिलात लगावली. शिंदे यांची माफी मागण्यास सांगितले. यावेळी देवपूर पोलीसही बँकेत दाखल झाले. त्यांनी शिवसैनिकांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले. अजगे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी, धीरज पाटील, पद्मा शिंदे यांच्यासह १५ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. यानंतर सोनवणे, परदेशी, पाटील यांना अटक करण्यात आली.

बँक व्यवस्थापकासह दोघांविरोधात गुन्हा

शिक्षिका पद्मा शिंदे यांच्या तक्रारीवरुन स्टेट बँकेच्या प्रमोद नगर शाखेचे व्यवस्थापक अतुल गांधी आणि कर्मचारी सदाशिव अजगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेत व्यवहार करण्यासाठी गेले असता गोल्ड लोनचे पैसे उशिरा आल्याच्या कारणावरुन व्यवस्थापक गांधी आणि कर्मचारी अजगे यांनी शिवीगाळ करुन अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार शिंदे यांनी पोलिसांकडे केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बँक कर्मचार्यांचे कामबंद आंदोलन

एसबीआय बँकेचे कर्मचारी सदाशिव अजगे यांना झालेल्या मारहाणप्रकरणी प्रमोद नगर बँक शाखेच्या कर्मचार्यांनी कामबंद आंदोलन केले. कर्मचार्यांनी काळ्याफीती लावून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि प्रमोद नगर शाखेसमोर निदर्शने केली. अधिकारी व कर्मचार्यांनी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांना निवेदन दिले. मारहाण करणार्यांविरोधात कठोर कारवाई करावी, अधिकारी व कर्मचार्यांच्या सुरक्षेसाठी कार्यक्षम यंत्रणा उभारावी, प्रमोद नगर शाखेसह संवेदनशील शाखांमध्ये बंदोबस्त व गस्त व्चवस्था करावी, जिल्हा पातळीवर बँकींग सुरक्षेसाठी एक विशेष समन्वय समिती स्थापन करावी, अशा मागण्या एसबीआय ऑफीसर्स असोसिएशनचे अध्यक्ष सचिन गांगुर्डे, दिनेश कौशिक, विनोद मराठे, ओम मराठे, सदाशिव अजगे, राजेंद्र चव्हाण, एस. पी. शिंपी, शफीक पिंजारी यांनी केल्या