जळगाव – खान्देशी बोलीतून जीवनाचे तत्वज्ञान सांगणाऱ्या थोर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची जयंती रविवारी त्यांचे सासर जळगाव तसेच माहेर आसोद्यात उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून बहिणाबाईंच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.

बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट तसेच भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या वतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या १४५ व्या जयंतीनिमित्त जळगाव शहरातील चौधरी वाड्यातील बहिणाई स्मृती संग्रहालयात बहिणाईंचे भावविश्व, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी बुलढाणा येथील कवी किरण डोंगरदिवे, पुणे येथील कवयित्री रेणुका पुरोहित, बहिणाबाईंच्या पणतू सून पद्माबाई चौधरी, स्मिता चौधरी, विश्वस्त दिनानाथ चौधरी, अशोक चौधरी, कांचन खडके भानुदास नांदेडकर, वैशाली चौधरी, कविता चौधरी, शोभा चौधरी, निलिमा चौधरी, दिपाली चौधरी, कीर्ती चौधरी, सुनंदा चौधरी, शितल चौधरी, कोकिळा चौधरी, श्रृती चौधरी यांच्यासह चौधरी वाड्यातील नागरिक उपस्थित होते.

नको नको रे ज्योतिषा हात माझा पाहू…, या बहिणाईंच्या काव्यपंक्ती आजच्या समाजाला जीवन समृद्ध करणारे तत्वज्ञान सांगतात. साधारणत: शंभर वर्षापूर्वी साहित्यातून बहिणाबाई चौधरी यांनी जो विचार समाजाच्या पुढे ठेवला, त्यातून आजची पिढी घडत आहे. अध्यात्मासह विज्ञान आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या कर्मावर विश्वास ठेवण्यास त्यांनी शिकवले. मराठीतील प्रत्येक साहित्यिक, विद्यार्थी, अभ्यासक हे बहिणाबाईंच्या कविता वाचल्याशिवाय राहत नाहीत. हाच खऱ्या अर्थाने त्यांना लाभलेला लोक पुरस्कार आहे. जीवन समृद्ध करण्यासाठी वाचन संस्कृती जोपासली पाहिजे. त्यातूनच व्यक्तिमत्व विकास घडतो. बहिणाबाई चौधरी यांच्या १५० व्या जयंती निमित्त संतवाणी आणि बहिणाबाईंच्या गाण्यांसाठी विशेष कार्यक्रम शासनाने शाळांमध्ये घेतले पाहिजे, अशी अपेक्षा कवी डोंगरदिवे यांनी व्यक्त केली.

शिक्षण घेतले म्हणजे कोणी साक्षर होत नसते. आई-वडील, शेती-मातीकडून आपण सतत काहीतरी घेत असतो. त्यातून नवीन काही तरी शिकतो. आणि मिळालेले शहाणपण आपल्याला शिक्षित करते. तसा सजग दृष्टिकोन आपल्यात हवा. माणसे वाचून समृद्ध करण्याचा दृष्टीकोन बहिणाबाईंनी कवितेतून आपल्याला दिला. दोन श्वासातील अंतर सांगून मनुष्याला संस्कारित करण्याचे अध्यात्मिक तत्वज्ञान सुद्धा बहिणाबाईंच्या कवितेतून मिळते, असे कवयित्री पुरोहित म्हणाल्या. यावेळी ज. सू. खडके विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आले. गांधी रिसर्च फाऊंडेशनची विद्यार्थिनी जयश्री मिस्त्री हिने अरे संसार संसार, या रचनेने कार्यक्रमाची सुरुवात केली. प्रास्ताविक विजय जैन यांनी केले. सूत्रसंचालन किशोर कुलकर्णी यांनी केले.

आसोदा येथेही कार्यक्रमांचे आयोजन

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे माहेर आसोदा येथेही त्यांच्या जयंती दिनी विविध कार्यक्रम आयोजित केले होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी खासदार उन्मेश पाटील यांनी बहिणाबाईंच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन केले. दरम्यान, सार्वजनिक विद्यालयात बहिणाबाईंची वेषभूषा करून आलेल्या विद्यार्थिनींनी नृत्यासह गाण्यांचे सादरीकरण केले. बहिणाबाई चौधरी स्मारक समितीचे अध्यक्ष किशोर चौधरी, मुख्याध्यापक मिलिंद बागूल, पर्यवेक्षक लालसिंग पाटील, मंगला नारखेडे आदी उपस्थित होते.