जळगाव – नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नसताना मंत्री छगन भुजबळ आणि गिरीश महाजन यांच्यात स्वातंत्र्य दिनापासून चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. दोघांमधील वाद कमी होण्याऐवजी उत्तरोत्तर वाढत चालल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर, भुजबळ रविवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना, महाजन यांनी त्यांची नाराजी दूर करण्याचा बराच प्रयत्न केल्याचे दिसून आले.
राज्यातील पालकमंत्र्यांची घोषणा होऊन अनेक महिने उलटले असले, तरी नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. शिंदे गटाच्या विरोधामुळे गिरीश महाजन यांच्या नियुक्तीला यापूर्वीच स्थगिती देण्यात आली आहे. दुसरीकडे दादा भुसे यांच्या नावावर शिवसेनेचा शिंदे गट अजुनही ठाम आहे. दरम्यान, स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणासाठी मंत्री महाजन यांची यावेळी नाशिकला नियुक्ती होताच छगन भुजबळ यांनी गोंदिया येथे ध्वजारोहणासाठी जाण्यास नकार दिला. काय करायचे ते नाशिकमध्येच, असे म्हणत त्यांनी काही वर्षांपूर्वी धुळ्याचे पालकमंत्रीपद नाकारल्याचेही उदाहरण दिले.
तशात ध्वजारोहण सोहळ्यानंतर महाजन यांनी ध्वजारोहण पार पडले आहे; आता हळूहळू पुढे जाऊ, असे वक्तव्य करत भुजबळ यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. तसेच नाशिकच्या पालकमंत्रीपदाची मी कधीच मागणी केली नव्हती किंवा फलकबाजी सुद्धा केली नाही, अशा शब्दांत त्यांनी भुजबळांना उद्देशून अप्रत्यक्ष टोला हाणला होता. भुजबळ यांनीही नंतर महाजन यांना नाशिकऐवजी आपल्या जामनेर मतदारसंघाकडे लक्ष देण्याचा सल्ला देऊन वातावरण आणखी जास्त तापवले होते.
या पार्श्वभूमीवर, जळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना मंत्री महाजन यांनी त्यांच्या खास शैलीत भुजबळांना प्रत्युत्तर देत त्यांनी जळगावची चिंता करू नये. जळगावची एकहाती सत्ता आम्ही घेणार आहोतच. याशिवाय, माझ्याकडे संपूर्ण उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी आहे. त्यामुळे मी नाशिकमध्ये पण येणार आहे, असा दावा केला होता. दरम्यान, छगन भुजबळ गेल्या आठवड्यात जळगावमध्ये अजित पवार गटाच्या मेळाव्यासाठी उपस्थित राहिले. तेव्हाही त्यांनी नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून आपल्या मनातील खदखद बाहेर काढली होती.
त्यानंतर रविवारी चाळीसगावमध्ये भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या महात्मा ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे लोकार्पणासाठी भुजबळ उपस्थित राहिले. यावेळी मंत्री गिरीश महाजन देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे व्यासपीठावरील दोघांची बैठक व्यवस्था एकमेकांच्या शेजारी होती. त्यामुळे दोघांकडे सर्वांचेच लक्ष होते.
परंतु, महाजन आणि भुजबळ हे दोघे नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून निर्माण झालेले आपसातील मतभेद विसरून कार्यक्रमाच्या ठिकाणी मुक्तपणे वावरले. किंवा त्यांनी एकमेकांना टोमणेही मारले नाही. विशेषतः मंत्री महाजन हे भुजबळ यांच्याशी हास्य विनोद करताना दिसून आले. त्यांच्यातील संवाद पाहुन कार्यक्रमास उपस्थित महायुतीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनाही बरे वाटले. यावेळी खासदार स्मिता वाघ, विधान परिषदेचे सदस्य योगेश टिळेकर, माजी आमदार साहेबराव घोडे आदी उपस्थित होते.