लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या मोहिमेत सहा महिन्यांत ९७ प्रकरणांमध्ये दोन कोटीहून अधिकचा दंड केला आहे. यातील एक कोटी तीन लाख रुपयांची वसुलीही करण्यात आली. २४ वाहने जप्त करुन १६ गुुन्हे दाखल झाले. इतक्या प्रकरणात कारवाई होऊन एकाही संशयिताला अटक झाली नाही.
अनधिकृत गौण खनिजाचा विषय जिल्ह्यात दोन ते तीन वर्षांपासून चांगलाच गाजत आहे. त्र्यंबकेश्वर परिसरात डोंगर, टेकड्या भुईसपाट करण्यात आल्या. इतकेच नव्हे तर, गोदावरीचे उगमस्थान असलेल्या ब्रम्हगिरी पर्वतालाही नख लावण्याचा प्रयत्न झाला होता.
हेही वाचा… अमळनेर तालुक्यातील बोरी नदीला पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला
अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीबाबत पर्यावरणप्रेमी व स्थानिक ग्रामस्थ वारंवार तक्रारी करत असले तरी कारवाई होत नसल्याचा सूर उमटतो. परंतु, जिल्हा प्रशासनाकडून अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीला चाप लावण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
नाशिक तालुक्यात सर्वाधिक कारवाई
एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत सर्वाधिक २९ प्रकरणात नाशिक तालुुक्यात कारवाई झाली. त्या खालोखाल सिन्नर (१५), कळवण (११), देवळा (आठ), दिंडोरी (सहा), निफाड, बागलाण आणि येवला (प्रत्येकी पाच), मालेगाव आणि नांदगाव (प्रत्येकी चार), त्र्यंबकेश्वर (दोन), पेठ, इगतपुरी, चांदवड (प्रत्येकी एक) अशी कारवाई झाली. सुरगाणा तालुक्यात मात्र एकही कारवाई झाली नाही.