नाशिक : केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयच्या कारवाईने इगतपुरीतील रिसॉर्टमधील उद्योग पुन्हा समोर आले आहेत. ॲमेझॉन सहायता सेवा केंद्राच्या नावाखाली अमेरिका, कॅनडासह अनेक देशांतील नागरिकांची फसवणूक करणारे बनावट कॉल सेंटर रेन फॉरेस्ट रिसॉर्टमध्ये कार्यरत होते. याआधी परिसरातील रिसॉर्ट्स रेव्ह पार्टी, आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांच्या मुलांचा बारबालांसोबत धिंगाणा, हुक्का पार्टीवरून गाजलेले आहेत.

इगतपुरीतील काही रिसॉट्स विविध कारणांनी नेहमीच चर्चेत असतात. सीबीआयच्या छाप्याने परदेशातील नागरिकांच्या फसवणुकीचे केंद्र देखील येथील रिसॉर्टमध्ये असल्याचे समोर आले. सीबीआयने इगतपुरी येथील रेन फॉरेस्ट रिसॉर्टमधील बेकायदेशीर कॉल सेंटर उद्ध्वस्त केले. ४४ लॅपटॉप, ७१ भ्रमणध्वनी, आणि अन्य डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले. सव्वा कोटींची बेहिशेबी रोकड, ५०० ग्रॅम सोने आणि एक कोटी रुपयांच्या सात अलिशान मोटारी जप्त करण्यात आल्या. या व्यतिरिक्त पाच लाखाची क्रिप्टोकरन्सी आणि दोन हजार कॅनेडियन डॉलर किंमतीचे भेटवस्तू प्रमाणपत्राचे (गिफ्ट व्हाऊचर) व्यवहार आढळून आले. या प्रकरणी मुंबईतील पाच संशयितांना अटक करण्यात आली. बेकायदेशीर कॉल सेंटर चालविण्यासाठी रिसॉर्टमध्ये भाडे तत्वावर जागा घेऊन घेतली गेली. संशयितांनी ६० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती.

डोंगराळ व दुर्गम भागातील इगतपुरीचे निसर्गसौंदर्य पावसात अधिकच खुलते. धबधबे, धुके, धरणांसह हिरव्यागार परिसराची भुरळ पडते. मुंबईपासून समीप असल्याने पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी उसळते. मागील काही वर्षात या भागात मोठ्या संख्येने रिसॉर्ट्स, खासगी व्हिला आणि हॉटेलची उभारणी झाली आहे. परंतु, यातील काही ठिकाणी गैरप्रकार झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.

गैरप्रकारांची मालिका

आठ वर्षांपूर्वी म्हणजे मार्च २०१७ मध्ये इगतपुरीतील मिस्टिक व्हॅली रिसॉर्ट्समध्ये आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांच्या मुलांनी मद्यपान करून बारबालांसह धिंगाणा घातला होता. पुणे, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार येथील आयपीएस, आयएएस आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे हे नातेवाईक होते. या प्रकरणी पोलिसांनी १३ जणांवर कारवाई केली होती.

जून २०२१ मध्ये इगतपुरीतील एका रिसॉर्टलगतच्या (बंगल्यात) नाशिक ग्रामीण पोलिसांनी रेव्ह पार्टीवर छापा टाकला होता. या प्रकरणी मराठी व दाक्षिणात्य मनोरंजन क्षेत्रातील अभिनेत्रींसह २२ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. नशेत नाचगाणी, हुक्का व अमली पदार्थांचे सेवन केले जात होते.

तीन वर्षांपूर्वी (मार्च २०२२) मध्ये त्रिंगलवाडी हद्दीतील माऊंटेन शॅडो रिसॉर्ट येथे अमली पदार्थांसह हुक्का पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. हक्क्यासह अमली पदार्थांचे सेवन करताना मुंबईतील २० महिलांसह एकूण ७५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.काही वर्षांपूर्वी अभिनेत्री लैला खान हिच्यासह कुटुंबियांची इगतपुरीतील दुर्गम भागातील एका बंगल्यात हत्या झाली होती.