जळगाव – जिल्ह्यातून हजारो प्रवासी पुणे येथे नोकरी, व्यवसाय तसेच शिक्षणानिमित्त ये-जा करतात. विशेषतः दिवाळीला एसटी तसेच खासगी निमआराम बसेस आणि रेल्वे गाड्यांमध्ये मोठी गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर, जळगाव-भुसावळमार्गे तीन विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या प्रशासनाने घेतला आहे. गर्दीच्या हंगामात प्रवाशांना त्यामुळे बऱ्यापैकी दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
फ्लाय ९१ या विमान कंपनीने गोवा, हैदराबाद आणि जळगाव दरम्यान थेट विमानसेवा सुरू करून प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. या सेवेला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर जळगावकरांकडून पुणे मार्गावरही विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली जात होती. त्याची दखल घेऊन फ्लाय ९१ कंपनीने जळगाव–पुणे विमानसेवा सुरू देखील केली आहे. ही सेवा सुरू झाल्यापासून नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि खासगी कारणांस्तव पुणे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय दूर झाली आहे.
मात्र, आठवड्यातून ठराविक दिवस असलेल्या विमानसेवेला खूपच मर्यादा आहेत. अशा स्थितीत भुसावळ-पुणे दरम्यान सुरू करण्यात आलेली हुतात्मा एक्स्प्रेस प्रवाशांसाठी खूपच सोयीची ठरली होती. मात्र, ती गाडी भुसावळऐवजी आता अमरावतीहून सोडण्यात येते. इतर बऱ्याच लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्या जळगावमार्गे पुणे जात असल्या, तरी त्यांना थांबा नाही. नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसमुळे बऱ्यापैकी सोय झाली असली, तरी मर्यादित आसन क्षमतेमुळे त्या गाडीचा ठराविक प्रवाशांनाच लाभ होत आहे.
दरम्यान, प्रवाशांच्या सोयीसाठी दिवाळी आणि छठ पुजेचे निमित्त साधून मध्य रेल्वेने विविध ठिकाणांवरून एकूण ९४४ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात जळगाव-भुसावळमार्गे धावणाऱ्या काही गाड्यांचा देखील समावेश आहे. ०१४१५ पुणे-गोरखपूर विशेष (६५ सेवा) रेल्वे गाडी २७ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत दररोज पुणे येथून ०६.५० वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे दुसऱ्या दिवशी १६.०० वाजता पोहोचेल. ०१४१६ गोरखपूर-पुणे विशेष (६५ सेवा) रेल्वे गाडी २८ सप्टेंबर ते एक डिसेंबर दरम्यान दररोज गोरखपूर येथून १७.३० वाजता सुटेल आणि पुणे येथे तिसऱ्या दिवशी ०३.१५ वाजता पोहोचेल. दोन्ही गाड्यांना भुसावळ स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
याशिवाय, ०१२०९ नागपूर-पुणे-नागपूर साप्ताहिक विशेष (२० फेऱ्या) रेल्वे गाडी २७ सप्टेंबर ते २९ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक शनिवारी नागपूर येथून १९.४० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ११.२५ वाजता पोहोचेल. ०१२१० नागपूर-पुणे-नागपूर विशेष (१० सेवा) रेल्वे गाडी २८ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक रविवारी पुणे येथून १५.५० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०६.३० वाजता पोहोचेल. दोन्ही गाड्यांना जळगाव आणि भुसावळ स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
०१४४९ पुणे-दानापूर-पुणे विशेष (१३४ सेवा) रेल्वे गाडी २५ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत दररोज पुणे येथून १५.३० वाजता सुटेल आणि दानापूर येथे तिसऱ्या दिवशी ०२.०० वाजता पोहोचेल. ०१४५० पुणे-दानापूर-पुणे विशेष रेल्वे गाडी २७ सप्टेंबर ते दोन डिसेंबर या कालावधीत दररोज दानापूर येथून ०५.३० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी १८.१५ वाजता पोहोचेल. या गाडीला भुसावळ स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.