जळगाव : भुसावळ येथे मध्य रेल्वेचे पहिले युनिफाईड कवच नियंत्रण केंद्र कार्यान्वित झाले आहे. त्या माध्यमातून प्रशासनाने अत्याधुनिक सुरक्षा उपायांचा अवलंब करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. ज्यामुळे रेल्वे गाड्यांचा वक्तशीरपणा वाढविण्यासह अपघातांची जोखीम कमी करणे आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

ही आधुनिक सुविधा भुसावळ विभागातील १३४ ठिकाणी कवच ​​प्रणालीचे निरीक्षण आणि देखरेखीसाठी एक मध्यवर्ती केंद्र म्हणून काम करेल. प्रगत तंत्रज्ञान आणि समर्पित नेटवर्क मॉनिटरिंग सिस्टीमने (एनएमएस) सुसज्ज असे हे केंद्र रिअल-टाइम पर्यवेक्षण सक्षम करण्यासह ऑपरेशनल कार्यक्षमता वाढवणार आहे. तसेच रेल्वे गाड्यांच्या परीचालनासाठी सुरक्षा उपाय मजबूत करण्यावर भर देणार आहे. कवच सिस्टम लॉजिक्ससाठी फॅक्टरी स्वीकृती चाचणी सुविधा हे या केंद्राचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. जी फील्ड तैनातीपूर्वी कवच ​​कॉन्फिगरेशनची इन-हाऊस चाचणी, प्रमाणीकरण आणि पडताळणी करण्यास मदत करेल. यामुळे संपूर्ण विभागात कवच प्रणालीची विश्वासार्हता, अचूकता आणि जलद अंमलबजावणी सुनिश्चित होईल.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी कवच ​​प्रणालीच्या अंमलबजावणीची तपासणी करण्यासाठी गुरूवारी दुसखेडा रेल्वे स्थानकाला सुद्धा भेट दिली. रिले रूममध्ये बसवलेल्या कवच उपकरणांच्या कामकाजाचा तसेच स्थानक प्रमुखांच्या पॅनेलचा आढावा त्यांनी घेतला. कवच ​​टॉवरला देखील भेट दिली. संबंधित वायरिंग आणि फील्ड इंस्टॉलेशन्सची तपासणी केली. सुरक्षा प्रणालीचे अखंड कामकाज सुनिश्चित करण्यासाठी कवच ​​इंस्टॉलेशन्सची योग्य देखभाल, विश्वासार्हता आणि मजबुती, याबाबतही महाव्यवस्थापक मीना यांनी तांत्रिक पथकांना मार्गदर्शन केले. रेल्वेच्या कामकाजात उच्च दर्जाचे मानक राखणे, सुरक्षा उपयांचा जास्तीत जास्त अवलंब करण्याची सूचनाही त्यांनी केली.

या तपासणीत मध्य रेल्वेने कवच सारख्या प्रगत सुरक्षा तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सातत्याने वचनबद्धता दर्शविली आहे. ज्याचा उद्देश ऑपरेशनल सुरक्षा सुधारणे, वेळेवर काम करणे आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवास प्रदान करणे असल्याचे महाव्यवस्थापक मीना म्हणाले. या प्रसंगी, प्रधान मुख्य सिग्नल आणि दूरसंचार अभियंता एम. एस. उप्पल, प्रधान मुख्य परीचालन व्यवस्थापक एस. एस. गुप्ता, विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल तसेच भुसावळ आणि विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी भुसावळ विभागीय रेल्वे रुग्णालयात नव्याने बांधलेल्या मॉड्यूलर ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन केले. ज्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सेवा वाढल्या आहेत. रुग्णालय व्यवस्थापन आणि तांत्रिक पथकाच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.