जळगाव : धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कन्नड घाटात जिल्ह्यातील चाळीसगाव महामार्ग पोलिसांनी एका मोटारीतून तब्बल ३९ किलो अँफेटामाइन अंमली पदार्थाचा साठा जप्त केला. ज्याची किंमत बाजारात सुमारे ६० कोटी रूपये आहे. ही कारवाई गुरूवारी सायंकाळी करण्यात आली. या प्रकरणी संशयित मोटार चालकाला ताब्यात घेण्यात आले असून, पोलिसांनी पुढील तपासाला गती दिली आहे.
दिल्लीहून निघालेला अंमली पदार्थांचा तस्कर मोटारीने इंदूर, धुळे, छत्रपती संभाजीनगरमार्गे बंगळुरूच्या दिशेने चालला होता. चाळीसगाव ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानच्या कन्नड घाटात सायंकाळी सातच्या सुमारास ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदी करत असताना नियमित तपासणीचा भाग म्हणून त्याची मोटार अडवली. तपासणी केली असता मोटार चालकाकडे कोणताही परवाना नव्हता. शिवाय तो सहकार्य न करता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने पोलिसांना मोटारीत काहीतरी असल्याचा संशय आला. त्यामुळे त्याच्या ताब्यातील मोटारीची संपूर्ण झडती घेण्याचा निर्णय पोलिसांना घेतला. तपासणी केल्यावर मोटारीच्या मागील सीटवर दोन बॅग आढळल्या. त्याबाबत विचारणा केल्यावर चालकाने समाधानकारक उत्तरे दिली नाही. तो टाळाटाळ करत असल्याचे लक्षात घेऊन पोलिसांनी त्या दोन्ही बॅग ताब्यात घेतल्या. त्यानंतर मोटारीच्या डिक्कीतही आणखी दोन बॅग सापडल्या. चारही बॅग उघडून पाहिल्यावर आतमध्ये तब्बल ३९ किलो वजनाचा अँफेटामाइन या अंमली पदार्थाचा साठा लपवून ठेवल्याचे दिसून आले.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मोटारीचा चालक सय्यद (४२, रा.दिल्ली) यास ताब्यात घेण्याची कारवाई केली. त्याच्याकडून जप्त केलेले अंमली पदार्थ नेमके कोणत्या प्रकारातील आहेत, याची खात्री करण्यासाठी जळगाव येथील पोलीस दलाच्या न्यायवैद्यक पथकालाही पाचारण करण्यात आले. तपासणी केल्यानंतर ते अँफेटामाइन असल्यावर शिक्कामोर्तब झाले. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी देखील रात्री उशिरा कन्नड घाटातील महामार्ग पोलीस चौकीला भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली. महामार्ग विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सावंत, उपनिरीक्षक शशिकांत पाटील, योगेश पवार, अमोल कावडे, महेंद्र अहिरराव, संदीप जगताप, अमीर तडवी आदी कारवाईत सहभागी झाले होते.
पोलीस तपासात मोटारीचा चालक कोणासाठी तस्करीचे काम करीत होता, अंमली पदार्थ तो कोणाला नेऊन देणार होता तसेच त्याच्या मागे मोठ्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय टोळीचा हात तर नाही, या दृष्टीने पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. त्यातून अधिक माहिती मिळाल्यानंतर पुढील तपासाला गती मिळू शकणार आहे. चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनीही मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रात्रीच कन्नड घाटातील पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कारवाईची माहिती दिली. त्याच प्रमाणे या प्रकरणाची नॉर्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून चौकशी करण्याची मागणी केली.