नाशिक : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा केल्यापासून ओबीसी समाजातील नेतेही सक्रिय झाले आहेत. त्यातच महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या निवडणुका लवकरच होणार असल्याने वेगवेगळ्या विषयांवरुन राजकारण तापण्याची शक्यता आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके तसेच ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी घटकांतील वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहून ओबीसी समाजाचे ऐक्य कसे आवश्यक आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

या प्रयत्नांचा एक भाग म्हणून जागर लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीने नाशिकरोड येथे लिंगायत समाजातील कार्यकर्त्यांचा सुसंवाद, परिसंवाद, खुले चर्चासत्र, मार्गदर्शन व सन्मान सोहळा असा कार्यक्रम छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

या कार्यक्रमात भुजबळ यांनी ओबीसी समाजापुढील आव्हानांचीही मांडणी केली. ओबीसी समाजामध्ये रोटी-बेटी व्यवहार वाढवून आपसांत ऐक्य प्रस्थापित केले पाहिजे. तंत्रज्ञान, जागतिकीकरण, आर्थिक परिवर्तन यांना तोंड द्यावे लागत असल्याने शिक्षणाशिवाय आता पर्याय नाही. फक्त पदव्या घेऊन चालणार नाही. जास्ती जास्त ज्ञान प्राप्त करून उच्चपदावर काम करावे लागेल, असे भुजबळ यांनी सांगितले. टाइपरायटर गेले आणि कॉम्प्युटर आले. प्रत्येकाला कॉम्प्युटर लागतो. डॉक्टर, इंजिनिअर, आणि शेतकऱ्यालाही काॅम्प्युटर लागतो. प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व जाती-धर्म एकत्र आणण्याचे कार्य केले. देशात आदिवासी, ओबीसींसह विविध समाजातील साडेसहा हजार जाती आहेत. मात्र, ओबीसींची स्वतंत्र जातगणना होणे आवश्यक आहे. यासाठी जनगणना आयुक्तांनी राज्यांमध्ये जातगणनेची प्रक्रिया राबवावी, अशी अपेक्षा भुजबळ यांनी व्यक्त केली. मराठा समाजाला आमचा कुठलाही विरोध नाही. मात्र ओबीसी समाजाला लढाई जिंकायची असेल, तर एकत्रित राहण्याची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामदास पाटील सुमठाणनकर हे होते. यावेळी ओबीसी प्रमाणपत्र मार्गदर्शक कैलास आढाव आणि महिला सक्षमीकरण मार्गदर्शक प्रेरणा बलकवडे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रगतीसाठी आधुनिक शिक्षणाची कास धरण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी जागर लिंगायत प्रतिष्ठानचे संस्थापक बद्रीनाथ वाळेकर, भिकनप्पा फत्तरफोडे, व्यापारी बँकेचे संचालक निवृत्ती आरिंगळेे, मनोहर कोरडे, कैलास आढाव, ज्योती खोले, वर्षा लिंगायत आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन महेश डबे, भाऊ आंधळकर यांनी केले. आभार अजिंक्य हिंगमिरे यांनी मानले.