लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक जून २०२४ मध्ये होणार असल्याने त्यासाठी शिक्षक मतदार नोंदणी ३० सप्टेंबर ते सहा नोव्हेंबर या कालावधीत करण्यात आली. मतदार प्रारूप याद्या २३ नोव्हेंबर रोजी प्रसिध्द झाल्या. या प्रारूप याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चुका असल्याचा दावा शिक्षकांकडून होत असताना शिक्षक संघटनेच्या वतीने मात्र या संदर्भातील अर्ज नेमका कोणाकडे दिला, याची खातरजमा करण्याची सूचना करण्यात आली आहे.
शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी अनेक उमेदवार इच्छुक असल्याने बहुतांश उमेदवारांनी या संदर्भातील अर्ज शिक्षकांकडून भरून घेतले. नुकतीच या संदर्भातील प्रारूप यादी जाहीर झाली. यादीत जिल्ह्यातील ४० शिक्षक मतदारांची नावे नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. प्रारूप याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चुका झाल्या आहेत. शिक्षक मतदार यादीत काही नावे नाहीत. अनेकांची नावे चुकली आहेत. तर, काहींची नावे दोन वेळा आली आलेत. काही शिक्षक मतदारांची नावे असली तरी शाळा दुसऱ्याच दाखविण्यात आल्या आहेत. इच्छुक उमेदवारांचीही नावे प्रारूप यादीत न आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून चार चार वेळा अर्ज तपासूनही मतदार यादीत नावे का नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आणखी वाचा-मालेगाव : भाजप प्रदेशाध्यक्षांची स्वारी, काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या घरी
दरम्यान, शिक्षकांकडून या प्रक्रियेविषयी संशय व्यक्त होत असतांना शिक्षक संघटनांकडून अर्ज नीट भरलेत का, कागदपत्रांची पूर्तता यावर बोट ठेवले जात आहे.
आम्ही शाळेतील सर्व शिक्षक मतदारांचे नोंदणी अर्ज एकाचवेळी तहसील कार्यालयात जमा केले. अर्ज संबंधित अधिकाऱ्यांनी बारकाईने तपासूनच स्वीकारले. त्याच्या पोचपावत्या आमच्याकडे आहेत. मात्र प्रारूप यादीत शाळेतील निम्म्या शिक्षकांची नावे नाहीत. मी स्वतः शिक्षक आमदारकीसाठी अर्ज भरणार आहे. माझेच नाव मतदार यादीत नाही. -सचिन देशमुख (माध्यमिक शिक्षक,चिखलओहोळ)
अर्ज नेमके कुठे दिले?
शिक्षक पदवीधर निवडणुकीसाठी इच्छुक राजकीय मंडळींच्या प्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणावर अर्ज भरून घेतले. मात्र ते अर्ज योग्य पध्दतीने भरले गेले का ? ते कार्यालयात जमा केले असतील तर त्याची रितसर पावती मिळते. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, अशा अनेक तांत्रिक बाबी आहेत. ही पूर्तता करूनही नाव नसेल तर पावतीनुसार हरकत नोंदवता येऊ शकते. मात्र बहुसंख्य लोकांना अर्ज कुठे भरला, पुढे त्याचे काय झाले, याची कल्पनाच नाही. -राजेंद्र निकम (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ)