नाशिक : गोदा प्रदूषणाबाबत महापालिका प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधण्याचा प्रयत्न करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमी निशिकांत पगारे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात महापालिका प्रशासनाविरुद्ध तक्रार केली आहे. पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला. या वेळी अ‍ॅड. अमोल घुगे, नदीप्रेमी योगेश बर्वे हेही उपस्थित होते.

गोदावरीमुळे नाशिक हे तीर्थक्षेत्र असून गोदावरीचे पाणी भाविक तीर्थ म्हणून प्राशन करतात. गोदावरी नदीच्या पाण्यात महानगरपालिका प्रशासनाने रामकुंडाच्या वरच्या बाजूला आणि रामवाडी पुलाच्या खालच्या बाजूला २०० ते ३०० मीटरवर लेंडी नाल्याच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात गटाराचे सांडपाणी सोडले आहे. या गटाराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास मोठय़ा प्रमाणावर इजा होऊन साथीचे आजार होऊ शकतात तसेच जीवितहानीही होऊ शकते. याची जाणीव असूनही महापालिका प्रशासनाकडून गोदावरी नदीत गटाराचे सांडपाणी सोडले जात असल्याचे पगारे यांनी या तक्रारीत म्हटले आहे.

उच्च न्यायालयातही गोदावरी नदीमध्ये सोडल्या जाणाऱ्या गटाराच्या पाण्यासंदर्भात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने महापालिका प्रशासनाला सांडपाण्याचे गटार बंद करण्यासंदर्भात वेळोवेळी आदेश दिले आहेत. प्रशासनाने आजपर्यंत काही सांडपाण्याची गटारे बंद केली असली तरीही सांडपाण्याची काही गटारे आजही सुरू आहेत. प्रदूषण मंडळ आणि उपसमितीने दिलेल्या अहवालात महापालिकेने आठ दिवसांत लेंडी नाला बंद करण्याचे आश्वासन दिले होते. महापालिका आयुक्तांशी या संदर्भात यापूर्वी पत्रव्यवहार केलेला आहे; परंतु अद्याप त्यांनीही कोणती कार्यवाही केल्याचे दिसून येत नसल्याचे पगारे यांचे म्हणणे आहे.

महानगरपालिका हद्दीतील सांडपाण्याची व्यवस्था करणे, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न, पिकांच्या दृष्टीने नुकसान होऊ नये यासाठी काळजी घेणे ही जबाबदारी नाशिक महापालिकेची आहे. गोदावरी नदीत गटाराचे सांडपाणी सोडून गोदावरीचे आरोग्य आणि नागरिकांच्या, भाविकांच्या श्रद्धा, भावना आणि आरोग्यास हानी पोहोचविणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाविरोधात चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी पगारे यांनी केली आहे.