आठवडय़ाभरात नवे ३०० रुग्ण आढळले

प्रल्हाद बोरसे, लोकसत्ता

मालेगाव : करोना संसर्गाचे नियंत्रण मिळवण्यात आश्चर्यकारक यश मिळवल्याने ‘मालेगाव प्रारूप’ म्हणून सर्वत्र बोलबाला झालेल्या मालेगावात गेल्या आठवडय़ाभरात तब्बल ३०० नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे  करोना संसर्गाची नियंत्रित स्थिती पुन्हा धोक्याच्या पातळीवर गेली आहे.

एप्रिल, मे महिन्याच्या पूर्वार्धात पुणे, मुंबई आणि ठाणे शहरांनंतर राज्यात सर्वाधिक करोना रुग्ण आढळून आलेले मालेगाव हे शहर उत्तर महाराष्ट्रातील करोनाचे केंद्र बनले होते. आठ एप्रिल रोजी सर्वप्रथम पाच रुग्ण आढळून आल्यानंतर दिवसागणिक रुग्णसंख्येत वाढ होऊन महिनाभरात ती ४०० च्या घरात गेली. दोन महिन्यांत ती  ८०० पार झाली. त्यानंतर मात्र परिस्थितीत सुधारणा होऊ  लागली. प्रशासकीय यंत्रणांनी घेतलेले कष्ट  तसेच लोकांनी त्यास दिलेला सकारात्मक प्रतिसाद फळास आला.  जून महिन्यापासून नवे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले. शेजारच्या नाशिकसह राज्यातील अन्य शहरांमध्ये रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत असताना मालेगावातील

स्थिती नियंत्रणात येणे हा सुखद धक्काच होता.  करोनावर नियंत्रण आणण्यासाठी केल्या गेलेल्या उपाययोजनांचे ‘मालेगाव प्रारूप’ सर्वत्र चर्चेत आले.

२० जून ते २० जुलै या महिनाभराच्या कालावधीत २५० रुग्णांची वाढ नोंदवली गेली असताना आता गेल्या आठवडय़ाभरात ३०० रुग्णांची झालेली वाढ ही धडकी भरवणारी आहे. एप्रिल आणि मे महिन्यातदेखील एका आठवडय़ात एवढी रुग्ण वाढ झालेली नव्हती. तेव्हा एकदा एका आठवडय़ात सर्वाधिक २०५ इतकी रुग्ण वाढ आढळून आली होती. शनिवारपासून सोमवापर्यंत अनुक्रमे ४२, ३९, ६७ याप्रमाणे शहरात नव्या रुग्णांची नोंद झालेली आहे. सुरुवातीच्या काळात संसर्ग झाला, तेव्हा शहराच्या पूर्व भागात रुग्णसंख्या अधिक आढळून येत होती. आता जी रुग्ण वाढ आढळून येत आहे, ती प्रामुख्याने पश्चिम भागातील आहे. नव्या रुग्णांमध्ये पूर्व भागातील रुग्णांची संख्या अगदीच नगण्य असल्याचे दिसत आहे.मधल्या काळात करोना नियंत्रणात आला होता हे खरे असले तरी धोका टळला नव्हता. या वस्तुस्थितीकडे बहुसंख्य लोकांनी दुर्लक्ष केले. सुरुवातीला सक्त असणारी प्रशासकीय यंत्रणा आता ढेपाळल्यागत झाल्याचे चित्र आहे.

शहरातील संगमेश्वर, मालेगाव कॅम्प, सोयगाव या भागांसह ग्रामीण भागात करोनाचा धोका वाढला आहे. या परिस्थितीला वेळीच आळा घालण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी कठोर उपाययोजना कराव्यात, मुखपट्टी न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, पोलिसांनी ठिकठिकाणी तपासणी नाके सुरू करावेत, एवढेच नव्हे तर किमान एक आठवडा टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय घ्यावा.

– डॉ.जयंत पवार, संचालक, मविप्र संस्था-९