नाशिक – राज्यातील नाट्यगृहांच्या नूतनीकरणातंर्गत सार्वजनिक वाचनालय नाशिकच्या परशुराम सायखेडकर नाट्यमंदिरास शासनाकडून मदत करण्याचे आश्वासन सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दिले.
मंत्रालयातील शेलार यांच्या दालनात आढावा बैठक झाली. बैठकीत शेलार यांनी माहिती दिली. महाराष्ट्राचा वारसा जपणारी आणि कलाकारांचे श्रद्धास्थान असणाऱ्या नाट्यमंदिरांची सूची तयार करण्यात येणार आहे. अशा नाट्यमंदिरांच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात मांडण्यात येणार असून लवकरच महाराष्ट्र शासनाच्या वतीने भरीव मदत करण्यात येणार आहे. परशुराम सायखेडकर नाट्यमंदिराच्या पुढाकारामुळे राज्यातील अनेक
नाट्यगृहांना झळाळी प्राप्त होणार आहे. याबाबत धोरण तयार करण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बैठकीत देण्यात आले. शेलार यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल नाट्यगृह सचिव जयेश बर्वे यांनी आभार मानले. याप्रसंगी सांस्कृतिक मंत्रालयाचे अप्पर सचिव महेश वावळ, गोरेगाव फिल्मसिटीचे प्रतिनिधी, उपसचिव सांस्कृतिक कार्य मंत्रालय तसेच परशुराम सायखेडकर नाट्य मंदिराच्या वतीने कार्याध्यक्ष संजय करंजकर, प्रमुख सचिव सुरेश गायधनी, ग्रंथसचिव देवदत्त जोशी आदी उपस्थित होते.