धुळे : मुलीचे लग्न सहा महिन्यावर येऊन ठेपले असतांना अतिवृष्टीमुळे संपूर्ण कापूस पीक हातचे गेले. त्यामुळे मनोधैर्य खचलेल्या शेतकऱ्याने आपल्या शेतातील आडव्या झालेल्या पिकातच कीटक नाशक प्राशन करून आत्महत्या केली. अजून एका कर्जबाजारी शेतकऱ्यानेही आत्महत्या केली. दोन्हीही घटना धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील आहेत.युवराज कोळी (४०, रा. कुरखळी, शिरपूर) असे सोमवारी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याआधी जगदीश वंजारी (४२, रा.भाटपुरा, शिरपूर) या शेतकऱ्याने कर्जामुळे गळफास घेतला.

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. यामुळे हताश झालेले शेतकरी आता आत्महत्येचा पर्याय निवडू लागले आहेत. आत्महत्या केलेले युवराज कोळी यांचा शेतीवरच उदरनिर्वाह होता. यंदा मोठ्या आशेने त्यांनी कपाशीची लागवड केली होती. वाढणारे पीक पाहून युवराज कोळी आनंदित होते. परंतु, त्यांच्या या आनंदावर सलग दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीने विरजण घातले. युवराज कोळी हे सोमवारी सकाळी शेतात गेले. त्यांना अतिवृष्टीचा कापसावर झालेला भयंकर परिणाम दिसला. शेतातील पीक पूर्णतः पाण्याखाली गेले होते. शेतातील तळ्यात उभ्या पिकाचा फुलोरा आणि कैऱ्या गळून पडल्याचे त्यांनी पाहिले. त्यांचे मनोधैर्य खचले. कापसाचे अपेक्षित उत्पादन येणार नाही, याची खात्री झाल्याने पिकातच त्यांनी कीटकनाशक प्राशन केले, अशी माहिती कोळी कुटुंबियांनी दिली.

युवराज कोळी यांच्या मुलीचा विवाह अवघ्या सहा महिन्यांवर आला आहे. विवाहाचा खर्च कापूस पिकाच्या उत्पादनातून भरून निघेल, अशी युवराज कोळी यांना आशा होती. याआधी २४ सप्टेंबर रोजी भाटपुरा (ता. शिरपूर) येथील जगदीश वंजारी (४२) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेतला होता. जगदीश यांनी धुळे जिल्हा मध्यवर्ती बँक आणि भाटपुरा विकास सोसायटीकडून शेतीवर कर्ज घेतले होते. याशिवाय एलआयसी आणि काही ठिकाणावरून खासगी कर्ज घेतले असल्याचे समजते. कर्जाची फेड करण्याच्या तुलनेत उत्पन्न येण्याची शक्यता नसल्याचा अंदाज त्यांना आला. त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले जाते. शासनाने तत्काळ आर्थिक मदत जाहीर करून आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

शिरपूर तालुक्यात दोन शेतकऱ्यांच्या मृत्युच्या घटना घडल्या आहेत. या घटनांची महसूल विभागाकडून नोंद घेण्यात आली असून त्यासंदर्भात संबंधित विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. या दोन्ही ठिकाणच्या घटनांची चौकशी व आवश्यक तर प्रशासकीय सोपस्कार पार पाडण्यात येतील. महेंद्र माळी (तहसीलदार,शिरपूर, धुळे.)