जळगाव – जिल्ह्यातील दोन माजी मंत्री आणि दोन माजी आमदार तसेच इतर काही पदाधिकारी राष्ट्रवादीत (अजित पवार) गेल्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटात सोमवारी येथे आयोजित विशेष मेळाव्यात पक्ष संघटन वाढीवर चर्चा करण्याऐवजी भविष्यात शरद पवार यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतल्यास तो आपण सर्वांनी मान्य करावा, अशी भूमिका काही प्रमुख नेत्यांनी घेतली.

माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील यांच्यासह अनेक मातब्बर त्यांच्या समर्थकांसह अजित पवार गटात सामील झाल्यानंतर शरद पवार गटाची मोठी हानी झाली आहे. अशा स्थितीत पक्ष संघटन बळकटीसाठी आयोजित केलेल्या बैठकीला मोठ्या गळतीनंतर नेमके कोण उपस्थित राहते, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. निरीक्षक भास्करराव काळे यांच्यासह विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूण गुजराथी, ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे, अमळनेरचे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी अध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील, महानगर अध्यक्ष एजाज मलीक, महिला आघाडीच्या मंगला पाटील, कल्पिता पाटील, उद्योजक श्रीराम पाटील आदी सर्वच प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

अजित पवार गटात गेलेल्या दोन्ही माजी मंत्र्यांसह, माजी आमदारांच्या प्रभावक्षेत्रातील जळगाव ग्रामीण, पारोळा, एरंडोल, धरणगाव, अमळनेर आदी तालुक्यांच्या कार्यकर्त्यांना सर्वात आधी बोलण्याची संधी मेळाव्यात देण्यात आली. त्यानुसार, बोलण्यासाठी उभे राहिलेल्या बऱ्याच जणांनी नेते सत्तेच्या लालसेने कुठेही जातात, पण कार्यकर्ते कायम पक्षाशी एकनिष्ठ राहतात. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान होत असल्याची खंत व्यक्त केली. दुसरीकडे, आमदार खडसे यांच्यासह पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी अध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील, महानगर अध्यक्ष मलीक आदींच्या बोलण्यातून शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र आल्यास आपण सर्वजण पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानू, असा सूर व्यक्त झाला. जोपर्यंत दोन्ही गटाच्या विलिनीकरणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत आपण आपले काम सुरू ठेवू. गरज पडल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये महायुतीशी संघर्ष करण्यासाठी तयार राहू, असेही संबंधितांनी मेळाव्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सांगितले. त्यामुळे काही वेळापूर्वी नेते कुठेही गेले तरी आम्ही शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहू, असे सांगणारे पदाधिकारी व कार्यकर्ते संभ्रमात पडल्याचे दिसून आले.