राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सर्वेक्षण
बदलते जीवनमान, तंत्रज्ञान याचा विपरीत परिणाम सर्वाधिक प्रमाणात बालकांवर होत आहे. जिल्ह्य़ात ५०० हून अधिक हृदयरोग असलेली बालके आहेत. मेंदू, रक्ताक्षय असलेल्या बालकांसह अनेक ठिकाणी कुपोषित बालके आढळून आली. आजाराचे निदान वेळेत न झाल्याने आणि पालकांनी सहकार्य न केल्याने नऊ बालकांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक चित्र राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत जिल्ह्य़ात शून्य ते सहा, सहा ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. अंगणवाडीतील बालकांची एप्रिल ते सप्टेंबर आणि ऑक्टोबर ते मार्च, तसेच सहा ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची वर्षांतून एकदा अशी तपासणी होत आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्य़ात आरोग्य तपासणीसाठी ७५ पथके कार्यरत असून यामध्ये वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि औषध संग्राहक आहे. जिल्ह्य़ातील चांदवड, देवळा, दिंडोरी, इगतपुरी, कळवण, मालेगाव, नांदगाव, नाशिक, निफाड, पेठ, सटाणा, सिन्नर, सुरगाणा, त्र्यंबक, येवला, मालेगाव, नांदगाव, सटाणा या ठिकाणी ऑक्टोबरअखेपर्यंत सात हजाराहून अधिक बालकांची तपासणी करण्यात आली आहे.
बालकांमध्ये हृदयरोग, टाळू दुभंगलेले, लघवी करताना त्रास, मेंदूचे वेगवेगळे आजार, आदिवासी भागात रक्ताक्षय, कुपोषणाचे प्रमाण सर्वाधिक आहे. हृदयरोग तसेच कुपोषणाचे प्रमाण इतर आजारांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. आकडेवारीचा विचार केल्यास एक हजार ६७२ बालकांना हृदयरोग असून एक हजार ६१ बालकांवर शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातील काही प्रकरणे महात्मा फुले जीवन योजनेंतर्गत समाविष्ट करण्यात आली, परंतु १०६ बालकांच्या पालकांनी शस्त्रक्रियेची तयारी नसल्याचे सांगितले. तर ५३ बालकांनी औषधोपचाराला प्राधान्य दिले. काही बालके स्थलांतरित झाली. यामुळे ४९४ बालकांवर हृदयरोग शस्त्रक्रिया झाली, तर ८१ बालके अद्याप शस्त्रक्रियेपासून वंचित आहेत. याशिवाय कान, नाक, घसा, कर्करोग, मूत्रपिंड, कुपोषित अशी बालके आहेत. पालकांनी शस्त्रक्रिया किंवा उपचाराची तयारी न दर्शवल्याने वर्षभरात नऊ बालकांचा मृत्यू झाला.
बालकांच्या तपासणीत हृदयरोगाचे प्रमाण जास्त आहे. वर्षांला जिल्ह्य़ात ४०० हून अधिक बालके ही जन्मत: हृदयात दोष असल्याने आजारी आढळतात. आदिवासी भागात कुपोषण, रक्ताक्षय मोठय़ा प्रमाणावर आढळून येतो. शहरातही जंक फूड, आरोग्यास घातक सवयीमुळे कुपोषण वाढत आहे. संबंधितावर शासकीय योजनेच्या माध्यमातून उपचार केले जातात.
– डॉ. दीपक बागमार (वैद्यकीय अधिकारी)