जळगाव : जिल्ह्यातील प्रवाशांना दुपारच्या वेळी नाशिक जाण्यासाठी सोयीच्या ठरणाऱ्या बडनेरा– नाशिक रोड अनारक्षित मेमू रेल्वे गाडीला ३० सप्टेंबरपर्यंत चालविण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. मात्र, प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता या गाडीला आणखी काही महिन्यांसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाकडून ०१२११ बडनेरा–नाशिक रोड अनारक्षित दैनिक विशेष मेमू रेल्वे गाडीला यापूर्वी ३० जूनपर्यंत चालवण्याची सूचना होती. नवीन सूचनेनुसार सदर गाडी एक जुलैपासून ३० सप्टेंबरपर्यंत चालविण्यात आली. या कालावधीत एकूण ९२ फेऱ्या मेमू रेल्वे गाडीच्या झाल्या. याशिवाय, ०१२१२ नाशिक रोड–बडनेरा अनारक्षित दैनिक विशेष मेमू रेल्वे गाडीला यापूर्वी ३० जूनपर्यंत चालविण्याची सूचना होती. नवीन सुचनेनुसार सदर गाडी एक जुलैपासून ३० सप्टेंबरपर्यंत चालविण्यात आली. या कालावधीत एकूण ९२ फेऱ्या मेमू रेल्वे गाडीच्या झाल्या.
त्यानंतर आता पुन्हा ०१२११ बडनेरा–नाशिक रोड अनारक्षित दैनंदिन विशेष मेमू रेल्वे गाडीला एक ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर दरम्यान चालविण्यात येणार आहे. या कालावधीत एकूण ९२ फेऱ्या मेमू रेल्वे गाडीच्या होतील. तसेच ०१२१२ नाशिक रोड–बडनेरा अनारक्षित दैनंदिन विशेष मेमू रेल्वे गाडीला एक ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर दरम्यान चालविण्यात येणार आहे. या कालावधीत एकूण ९२ फेऱ्या मेमू रेल्वे गाडीच्या होतील.
बडनेरा जंक्शन ते नाशिक रोड दरम्यान धावणाऱ्या मेमू रेल्वे गाडीला जळगाव जिल्ह्यात बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, कजगाव आणि चाळीसगाव येथील स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. भुसावळ ते देवळाली आणि भुसावळ ते इगतपुरी दरम्यान धावणाऱ्या गाड्यांव्यतिरिक्त जळगाव येथून दुपारी एकही गाडी पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिककडे जाण्यासाठी नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेता दुपारी पाचोरा, चाळीसगावकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी एखादी गाडी सुरू करण्याची मागणी नुकतीच रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत भुसावळमध्ये करण्यात आली. कारण, लांबपल्ल्याच्या अनेक गाड्यांमध्ये आधीच मोठ्या प्रमाणात गर्दी राहत असल्याने स्थानिक प्रवाशांचे खूप हाल होतात. बऱ्याच वेळा जागा मिळत नाही.
मात्र, बडनेरा–नाशिक रोड या मेमू रेल्वे गाडीच्या रूपाने दुपारच्या वेळी साडेतीनच्या सुमारास हक्काची गाडी उपलब्ध झाल्याने जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी सोय अलीकडच्या काळात झाली आहे. विशेषतः दिवाळीसह इतर सणांच्या वेळी होणाऱ्या गर्दीच्या काळात बडनेरा–नाशिक रोड मेमू रेल्वे गाडी खूपच उपयुक्त ठरते. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता दर तीन महिन्यांनी वारंवार मुदतवाढ देण्यापेक्षा ही गाडी कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात यावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.