नाशिक : मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनादरम्यान खाण्या-पिण्यापासून ते शौचालय, स्वच्छतागृहापर्यंत आंदोलकांना वंचित ठेवले जात असल्याचा आरोप होत आहे. राज्यभरातून येणारी वाहने आंदोलनस्थळी पोहोचू नये म्हणून रस्त्यात वेगवेगळी कारणे देऊन पोलीस अडवणूक करतात, माघारी पाठवत आहे. रात्री याच कारणास्तव नाशिकसह इतर भागातील शेकडो वाहने माघारी परतल्याचे स्थानिक सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. आंदोलकांना अन्नपाण्याविना अडचणी उद्भवू नयेत म्हणून संबंधितांनी आता टेम्पोद्वारे कोरडे खाद्य पदार्थ, पाण्याच्या बाटल्या मुंबईला नेण्याची तयारी केली आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर पुकारलेल्या आंदोलनात नाशिकमधून मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते मुंबईला गेले. परंतु, वाहनांमधून रस्ते मार्गाने जाणाऱ्या काही मोजक्याच लोकांना प्रत्यक्ष आझाद मैदानावर पोहोचता आले. कारण, रस्त्यात ठिकठिकाणी पोलिसांनी नाशिकसह राज्यभरातून आलेली वाहनांची अडवणूक केल्याची तक्रार सकल मराठा समाजाचे पदाधिकारी राम खुर्दळ यांनी केली. पुढे वाहतूक कोंडी आहे, वाहने नेता येणार नाही, कित्येक किलोमीटर पायपीट होईल, गर्दीमुळे आंदोलन स्थळी प्रवेश मिळणार नाही अशी कारणे देत पोलिसांनी शेकडो वाहनांना माघारी पाठवून दिल्याचे खुर्दळ यांनी सांगितले. रेल्वेने जाणाऱ्यांना हा जाच सहन करावा लागला नाही. ते थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर पोहोचले आणि आंदोलनस्थळी गेले. रेल्वेने आंदोलनस्थळ गाठता येत असल्याचे लक्षात आल्यावर काहींनी आपली वाहने ठाणे, कल्याणमध्ये उभी करून रेल्वेने आंदोलनात सहभागी होणे पसंत केले.
मराठा समाजातील आंदोलकांना जेवण, नाष्टा, चहा मिळू नये म्हणून आझाद मैदान परिसरातील दुकानें बंद ठेवल्याचा आरोप सकल मराठा समाजाचे पदाधिकारी करण गायकर यांनी केला. इतकेच नव्हे तर, लालबागचा राजाचे अन्नछत्र देखील बंद ठेवल्याचे आरोप त्यांनी केला. यामुळे नाशिकमधून खाण्या-पिण्याचे पदार्थ उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आले. जाचक अटी लावून सरकारने मराठा समाजाला मुंबईत हिन वागणूक दिल्याचा अनुभव आंदोलक राम खुर्दळ, संजय देशमुख यांनी कथन केले.
मुंबईतील मराठा बांधवांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून मखमलाबाद, गिरणारेसह आसपासच्या १० ते १२ गावांमधून टेम्पोतून अन्न पाण्याची रसद नेण्यात येणार आहे. यासाठी एक घर – चार पोळी, मिरची ठेचा असा उपक्रम राबविला जात आहे. भाकरी, पोळी, पिठलं, मिरचीचा ठेचा, पापड चटणी, चिवडा, फरसाळ असे खाद्य पदार्थ आणि पाण्याच्या बाटल्या टेम्पोतून रविवारी मुंबईतील आंदोलनस्थळी नेले जाणार असल्याचे सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.