नाशिक: ज्वलनशील कच्च्या मालामुळे जिंदाल पॉलीफिल्म्समध्ये भडकलेल्या भीषण आगीवर ४२ तासांहून अधिक काळानंतरही नियंत्रण मिळवता आलेले नाही. कारखान्यात ‘प्रॉपेन’नामक रासायनिक पदार्थाची टाकी आहे. आगीची धग तिथपर्यंत पोहोचून अनर्थ घडू नये म्हणून सभोवतालचा एक किलोमीटरचा परिसर रिक्त करण्यात आला. मुंबई, ठाणे, भिवंडी, पिंपरी-चिंचवड येथील अग्निशमन पथकेही आगीवर नियंत्रण मिळविण्याच्या कार्यात सहभागी झाली असून एनडीआरएफचे विशेष पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलीफिल्म्स कारखान्यात लागलेली आग दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी सायंकाळपर्यंत धुमसत होती. ज्वलनशील कच्चा माल, रसायनांमुळे तिने संपूर्ण कारखान्याला वेढा घातला. पहिल्या दिवशी वितळलेल्या प्लास्टिकवर पाय पडून दोन कामगार जखमी झाले होते. सातत्याने पाणी मारूनही ती आटोक्यात येत नसल्याने आसपासच्या जिल्ह्यांतील अग्निशमन दलांनाही पाचारण करण्यात आले. कारखान्यात फिल्म बनविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ’पॉली प्रॉपलीन चिप्स‘ या अतिज्वलनशील कच्च्या मालाचा साठा आहे. त्यामुळे आग विझवण्यास विलंब होत असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
बुधवारी उपविभागीय अधिकाऱ्यांनी तीन किलोमीटरपर्यंतच्या क्षेत्रात धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन या क्षेत्रात जमावबंदी लागू केली होती. या क्षेत्रात शस्त्र, ज्वलनशील पदार्थ, धोकादायक वस्तू घेऊन फिरण्यास मनाई करण्यात आली. परिसरात सार्वजनिक ठिकाणी सांस्कृतिक, धार्मिक किंवा राजकीय कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली. कारखान्यालगतच्या कॉलनीत २०० ते ३०० कामगार वास्तव्यास होते. त्यांना व्यवस्थापनाने सुरक्षित स्थळी हलविल्याचे तहसीलदार अभिजित बारावकर यांनी सांगितले. कारखान्याजवळ एक शाळा असून उन्हाळी सुट्टीमुळे ती सध्या बंद आहे.
परिसरात प्रवेशास प्रतिबंध
कारखान्यात आग लागलेल्या ठिकाणापासून प्रोपेन टँक ३० मीटरवर आहे. या टाकीच्या शीतकरणाची प्रक्रिया सुरू आहे. औद्योगिक सुरक्षा संचालनालयाने खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळाच्या सभोवतालचा एक किलोमीटर परिसर रिकामा केला आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करीत या क्षेत्रात प्रवेशास प्रतिबंध केला आहे.
अग्निशमन दलांकडून प्रयत्न
पहिल्या दिवशी नाशिक महापालिकेसह जिल्ह्यातील १२ बंब आणि अग्निशमनच्या सुमारे ५० जवानांनी अथक प्रयत्न करूनही आग आटोक्यात आली नसल्याने प्रशासनाने ठाणे, भिवंडी, पिंपरी-चिंचवड, शहापूर येथील अग्निशमन दलासह मुंबईतील टाटा पॉवर, गोदरेज, कल्याणमधील सेंच्युरी रेयॉन आदी खासगी कंपन्यांच्या अग्निशमन दलाच्या गाड्याही मागवून घेतल्या. जिंदालमधील आगीवर नियंत्रण मिळविण्याच्या कामात २३ यंत्रणा सहभागी झाल्या आहेत. यात नाशिक मनपा, पिंपळगाव बसवंत, निफाड, ओझऱ्, एचएएल, सिन्नर अग्निशमन दलासह एनडीआरएफ, पोलीस आणि महसूल यंत्रणा आदींचा समावेश आहे.
आगीच्या कारणाचा शोध
इगतपुरीतील प्रकल्पात २१ मे रोजी पहाटे आगीची दुर्घटना घडली. यामुळे प्रकल्पातील काही भागातील उत्पादन विस्कळीत झाले आहे. आगीचे कारण शोधले जात आहे. या दुर्घटनेत झालेले नुकसान योग्यवेळी मोजले जाईल. हा प्रकल्प विमा संरक्षित असून आगीची माहिती संबंधित विमा कंपनीला दिली गेल्याचे जिंदाल पॉलिफिल्म्सने मुंबई व राष्ट्रीय शेअर बाजारात पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.