नाशिक – वैविध्यपूर्ण सजावटीला अंतिम स्वरुप देत बुधवारी लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी गणेश भक्त सज्ज झाले आहेत. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या. दुसऱ्या दिवशी अशीच स्थिती राहणार असल्याने अनेकांनी पूर्वसंध्येला लाडक्या बाप्पाला घरी नेण्यास प्राधान्य दिले. गणेशोत्सवात सजावट साहित्य, रोषणाई, फळे-फुलांसह मिठाई, मोदक पीठ, खिरापतीच्या साहित्याची मोठी खरेदी होत असून बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल वाढली आहे.

गणेशोत्सवाला बुधवारी सुरूवात होत असून अधुनमधून कोसळणाऱ्या पावसाची पर्वा न करता सर्वत्र सजावटीची कामे जोमात सुरू आहे. गणेशोत्सव पर्यावरणस्नेही पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी सामाजिक संस्था व महापालिका प्रयत्नशील आहे. बाजारपेठेत सजावट साहित्य, तयार सजावट, रोषणाईसाठी इलेक्ट्रीक माळा आदी खरेदीसाठी गर्दी उसळली आहे. गणपती बाप्पासाठी फुलांची खरेदी असो वा मोदक, खिरापत आदींसाठी आवश्यक ते जि्न्नस खरेदीसाठी लगबग सुरू आहे.

गणेशोत्सव वर्षातून एकदाच येतो. त्यामुळे खरेदीसाठी भक्त हात आखडता घेत नसल्याचे व्यावसायिक सांगतात. दुर्वा, जास्वंदीसह अन्य फुलांची मागणी वाढली आहे. एकूणच खरेदीचा ओघ वाढल्याने बाजारपेठेला चालना मिळाली. त्यामुळे गणपती बाप्पा पावल्याची छोटे-मोठे विक्रेते, व्यावसायिक, किराणा दुकानदारांमध्ये भावना असल्याचे नाशिक जिल्हा धान्य व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांनी सांगितले. खोबरे, मोदक पीठ, सुका मेवा यांना मोठी मागणी आहे. त्यांच्या दरात सरासरी ५० ते १०० रुपयांनी वाढ झाली असली तरी खरेदीवर कुठलाही परिणाम झाला नसल्याचे संचेती यांनी नमूद केले.

सर्वत्र वाहतूक कोंडी

मध्यवर्ती भागासह अनेक भागात लहान-मोठ्या रस्त्यांवर गणेश मंडळांनी भव्य मंडप उभारले आहेत. काही ठिकाणी छोट्या विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. यामुळे सीबीएस, शालिमार, अशोकस्तंभ, रविवार कारंजा यातील सर्व भागात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. मेनरोड, कानडे मारूती लेन, दहीपूल, रविवार कारंजा, फूल बाजार परिसरात चालायला जागा नाही.

अशोक स्तंभ, घनकर गल्ली. रविवार कारंजा, जुनी तांबट लेन परिसरात मंडपांमुळे वाहतूक अन्य लहान-मोठ्या रस्त्याने वळविण्यात आली. मध्यवर्ती भागातील रस्ते आधीच अरुंद आहेत. खरेदीसाठी भक्तांची गर्दी, गणेश मंडळांकडून सजावटीची तयारी याचा परिणाम अनेक भागात वाहतूक कोंडीत झाल्याचे पहायला मिळाले.