जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शुक्रवारी सोन्याने पुन्हा नवा विक्रम केला. धनत्रयोदशीच्या आधी सोन्याची किंमत कमी होण्याच्या आशेवर बसलेल्या ग्राहकांमध्ये त्यामुळे मोठी खळबळ उडाली. दुसरीकडे चांदीच्या दरातही वाढ नोंदवली गेली.

धनत्रयोदशी आणि दिवाळी जवळ आली असताना सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे ग्राहकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. धनतेरस आणि दिवाळीला सोने खरेदी करणे शुभ मानतात. मात्र, यावर्षी जास्त किंमतींमुळे ग्राहक सोन्याची खरेदी कमी करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होताना दिसत आहे. सोन्याचे दर प्रति औंस सुमारे ४,४०० डॉलर्सवर पोहोचले आहेत, जी गेल्या १७ वर्षांतील सर्वात मोठी साप्ताहिक वाढ असल्याचे बोलले जाते. या वर्षी आतापर्यंत सोन्यात ६० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे.

आर्थिक आणि भू-राजकीय अस्थिरतेच्या काळात सोने आणि चांदी ही गुंतवणूकदारांची पहिली पसंती असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आर्थिक अनिश्चितता, चलनवाढ आणि बदलत्या जागतिक धोरणांमुळे सोने-चांदी सुरक्षित संपत्ती बनले आहे. दरम्यान, धनत्रयोदशी आणि दिवाळीसारख्या सणाच्या प्रसंगी सोन्याची मागणी बऱ्यापैकी वाढते, ज्यामुळे किमतीही वधारतात.

याशिवाय, आंतरराष्ट्रीय सोन्याच्या किमती आणि चलन दर देखील देशांतर्गत किमतींवर थेट परिणाम करतात. दरम्यान, यंदा १० ते २० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या नाण्यांना आणि १० ते १०० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या नाण्यांना जास्त मागणी राहण्याची चिन्हे आहेत. या नाण्यांवर लक्ष्मी आणि गणेशाच्या प्रतिमा कोरण्यात आल्या आहेत.

शहरात गुरूवारी दिवसभरात ७२१ रुपयांची वाढ नोंदवली गेल्याने २४ कॅरेट सोन्याने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ३२ हजार ०४६ रुपयांचा उच्चांक केला होता. शुक्रवारी सकाळी बाजार उघडताच पुन्हा ३३९९ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याने एक लाख ३५ हजार ४४५ रूपयांचा नवीन उच्चांक केला. दररोज दरवाढ होत असल्याने सोने गेल्या आठवडाभरात ८३४३ रुपयांनी वधारले आहे.

चांदीत १०३० रूपयांनी वाढ

शहरात गुरूवारी दिवसभरात तब्बल १० हजार ३०० रुपयांची घट नोंदवली गेल्याने चांदी जीएसटीसह प्रति किलो एक लाख ८० हजार २५० रूपयांपर्यंत घसरली होती. आठवडाभरात २९ हजार ८७० रुपयांची दरवाढ झाल्यानंतर चांदी दोन लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, गुरूवारी १० हजारांपेक्षा अधिक घट नोंदवली गेल्याने ग्राहकांना धनत्रयोदशीच्या आधी दिलासा मिळाला. प्रत्यक्षात, शुक्रवारी सकाळी बाजार उघडताच पुन्हा १०३० रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदी जीएसटीसह प्रति किलो एक लाख ८१ हजार २८० रूपयांपर्यंत जाऊन पोहोचली.