शहराची लोकसंख्या विचारात घेता पंचवटी आणि सिडको परिसरात दोनशे खाटांच्या रुग्णालयाची आवश्यकता आहे. त्यामुळे पंचवटी व सिडको भागात दोनशे खाटांच्या रुग्णालयाचा प्रस्ताव तयार करण्यात यावा, अशी सूचना प्रतिपादन राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांना केली.
हेही वाचा >>> कारवाई न करण्यासाठी २० हजारांची मागणी; मालेगावच्या पोलीस निरीक्षकासह तिघांविरुध्द गुन्हा दाखल
नाशिक महानगरपालिका कार्यालयात आयोजित विविध विकासकामे आणि योजनांचा आढावा घेतला त्यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे बोलत होते. यावेळी खा. हेमंत गोडसे, प्रशासक तथा महानगरपालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, अतिरिक्त आयुक्त (शहर) अर्चना तांबे, उपायुक्त (प्रशासन) मनोज घोडे-पाटील, उपायुक्त मुंडे, उपायुक्त (अतिक्रमण) करुणा ढहाळे, उपायुक्त (समाज कल्याण) दिलीप मेनकर, मुख्य लेखा परीक्षक बोधी किरण सोनकांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी ( स्मार्ट सिटी) सुमंत मोरे , शहर अभियंता शिवकुमार वंजारी आणि इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलतांना भुसे म्हणाले, शासनाच्या धोरणानुसार महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कृषी, आरोग्य आणि शिक्षण विभाग सक्षम करण्यात यावे. नाशिक जिल्ह्यात कृषी व आरोग्य विभागाबरोबरच प्राधान्याने शिक्षण विभागही अधिक सक्षम करण्यात यावा. मनपा शाळाबरोबरच अंगणवाड्या देखील भौतिक मुलभूत सुविधांनी परिपूर्ण करावे, जेणेकरून शैक्षणिक वातावरण पोषक होऊन पालक महापालिका शाळांमध्ये आपल्या मुलांना पाठविण्यास पुढे येतील, असेही भुसे यांनी सांगितले.
हेही वाचा >>> मान्यवरांच्या उपस्थितीत ‘गौदागौरव’चे प्रकाशन
नवीन नाशिक मध्ये बांधलेल्या सदनिका ९९वर्षाच्या कराराने देण्यात आलेल्या आहेत या सदनिका फ्री होल्ड करून मालकी हक्काने कायमस्वरूपी मिळवून देण्याची कार्यवाही करावी. नाशिक शहरामध्ये १५९ झोपडपट्टया असून झोपडपट्टी धारकांची संख्या साधारणतः एक लाख ९२ हजार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर आराखडा तयार करून झोपडपट्टी धारकांना घरपट्टी लागू करावी, तसेच या जागेवर एस आर एस स्कीम राबवून पक्की घरे बांधून द्यावीत, असेही भुसे यांनी सांगितले. भुसे म्हणाले की, नाशिक रोड साठी नवीन पाणीपुरवठा योजना तयार करावी. घरपट्टी कराच्या दराचे पुनर्विलोकन करून सुधारणा करण्यात यावी. तसेच महानगरपालिकेने आकृतीबंध मंजूर करून रिक्त पदे भरण्याबाबतची कारवाई सुरू करावी. मेट्रो प्रकल्प स्मार्ट सिटी प्रकल्पाचा आढावा घेऊन नाशिक शहरातील नैसर्गिक नाले उपनद्या व गोदावरी तीरावरती संरक्षक भिंतीचे आरसीसी किंवा गॅबियन हॉलमध्ये बांधकाम करून सुशोभित करण्याबाबतची सूचना यावेळी भुसे यांनी केली. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सादरीकरणाद्वारे आपापल्या विभागाची माहिती पालकमंत्री भुसे यांना दिली.