जळगाव – जिल्ह्यात महायुतीचे चार मंत्री असले, तरी अधिकारी पण तितकेच कलाकार आहेत. जसा माणूस येतो तसे ते बोलतात. जामनेर (गिरीश महाजन) आलं की जामनेरसारखं, भुसावळ जंक्शन (संजय सावकारे) आलं की भुसावळसारखं आणि मी मध्ये बसलो आहे एरंडोली करणारा, अशी टोलेबाजी शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे शुक्रवारी एका कार्यक्रमात केली.
जळगावमध्ये महसूल सप्ताहानिमित्त उत्कृष्ट अधिकारी आणि कर्मचारी यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन नियोजन समितीच्या सभागृहात शुक्रवारी करण्यात आले होते. त्या ठिकाणी आपल्या नेहमीच्या शैलीत भाषण करताना पालकमंत्री पाटील यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना चिमटे काढत त्यांच्या चांगल्या कामाचे कौतुकही केले. संपूर्ण देशाचा आणि महाराष्ट्राचा सध्या तलाठी आणि ग्रामसेवक या दोनच लोकांवर सर्वात जास्त विश्वास आहे. माझ्यासह मंत्री गिरीश महाजन, संजय सावकारे यांना जळगाव जिल्ह्यात सर्व जण भाऊ म्हणतात. मात्र, ग्रामसेवक आणि तलाठी यांना आप्पा ही पदवी कायमस्वरूपी मिळाली आहे. दोघेही पूर्ण महाराष्ट्राचे दुकान बॅगेत घेऊन फिरतात.
एखादा चांगले काम करणारा तलाठी आमच्याकडून दुखावला गेला, तर तो १०० ते २०० मते सहज फिरवून टाकतो. मात्र, तलाठी चांगले काम करत नसेल आणि त्याची बदली केली तर २०० ते ३०० मते सुद्धा वाढतात, अशी मिश्किल टिप्पणी पालकमंत्री पाटील यांनी केली. कोणत्याही प्रकरणात ज्यांनी निकाल दिला आहे, तेच तहसीलदार फेर तपासणीसाठी कसे येतात ? पहिला तहसीलदार खोटा होता का ? हे कधी कधी मला कळत नाही, अशी खंत सुद्धा त्यांनी व्यक्त केली. तसेच आपण ४५ वर्षांपासून आमदार आहोत. १२ वर्ष जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या पायऱ्या चढून इथपर्यंत आलो, असेही त्यांनी नमूद केले.
जळगाव जिल्ह्यात महसूल विभागाने अतिशय चांगले काम गेल्या काही वर्षात केले आहे. इथे इतर पक्षांचे लोक येत नाही, तो एक मोठा फायदा आहे. सत्ताधारी पक्षांमध्ये एक विचाराचे लोक असल्याने निश्चितपणाने प्रशासनाला काम करताना कोणतीच अडचण येत नाही. आम्ही सगळ्या राजकीय पक्षांना सांभाळतो, जे काम गिरीशभाऊंना चांगले जमते. आम्हाला ते फार काही जमत नाही. मात्र, जसे आम्ही सगळ्यांना सांभाळतो तशी ती अधिकाऱ्यांचीही ती जबाबदारी असते. आणि ते काम जळगावचे जिल्हाधिकारी चांगल्या प्रकारे करतात, असे ते म्हणाले. आदिवासी महिलेची रस्त्यातच प्रसूती झाली त्यावेळी आम्ही मंत्री जिल्ह्यात उपस्थित नव्हतो. मात्र, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी हे दोघे तिथे पायी चालत गेले, असे बोलून पालकमंत्री पाटील यांनी जिल्हा प्रशासनाच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.