नाशिक : जुलै महिन्यातील पावसात शहरातील रस्त्यांवर पडलेले तब्बल साडेसहा हजार खड्डे बुजविण्याचा दावा करणाऱ्या महापालिकेला ऑगस्टमधील पावसाने पुन्हा तीच कसरत करावी लागत असल्याने खड्डेमय शहराचे चित्र कायम राहिले आहे. मंगळवारी सकाळपासून शहरात संततधार सुरू आहे. यापूर्वी खड्डय़ांवर केलेली मलमपट्टी कुचकामी ठरली असून अनेक प्रमुख चौकात खड्डे, चिखलमय पाण्याने वाहतूक कोडींचा जाच वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. पाऊस उघडीप घेत नसल्याने विशिष्ट मिश्रणाने अर्थात कोल्डमिक्सने खड्डे बुजविता येत नसल्याचे कारण महापालिकेने दिले आहे.

जुलैच्या मध्यावर झालेल्या पावसाने शहरातील लहान-मोठय़ा सर्वच रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली होती. नव्याने तयार झालेल्या रस्त्यांची वेगळी अवस्था नव्हती. महापालिकेच्या आकडेवारीनुसार रस्त्यांवर सुमारे साडेसहा हजार खड्डे पडले होते. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर बारीक खडी- डांबर वा पेव्हर ब्लॉकने बुजविण्याचे काम हाती घेतले गेले. ज्या नव्या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदारांची आहे, त्यांना नोटिसा बजावत हे काम करण्यास सांगण्यात आले.

या माध्यमातून बुजविलेल्या खड्डय़ांचा पावसात मात्र निभाव लागत नसल्याचे चित्र आहे. मंगळवारी सकाळपासून शहर परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. अनेक भागात बुजविलेल्या खड्डय़ांची स्थिती आधीसारखी झाली आहे. लहान-मोठय़ा सर्वच रस्त्यांची बिकट अवस्था आहे. पावसाचे पाणी खड्डय़ात साचून राहत असल्याने खोलीचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावत आहे. खड्डे, चिखल, पाणी यामुळे धोकादायक बनलेल्या रस्त्यावरून वाहनधारकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते. त्यामुळे वाहतुकीची गती मंदावली असून अनेक चौक, रस्त्यांवरील वाहतूक कोंडीचे ते कारण ठरत आहे.

भर पावसात खड्डय़ांची केलेली दुरुस्ती अनेक ठिकाणी निष्फळ ठरल्याचे मनपाचे अधिकारी मान्य करतात. पावसात खडी, पेव्हर ब्लॉकने खड्डे बुजविले गेले. कोल्ड मिक्सचा वापर करता येत नाही. ज्या रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडले, तिथे पुन्हा बुजविण्याचे काम करावे लागत आहे. तीन वर्षे कालावधी संपलेल्या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेवर आहे. महिनाभरात साडेसहा हजार खड्डे बुजविले गेले.

पाऊस कायम राहिल्याने हेच काम वारंवार करावे लागत असल्याचे बांधकाम विभागाचे अधिकारी सांगतात. पावसाळय़ाआधी चकाचक दिसणारे बहुतांश रस्ते खड्डेमय झाले आहे. बुजविलेल्या खड्डय़ांवर दुरुस्तीकामी पुन्हा निधी खर्ची पडत आहे. खड्डय़ांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल, याचा फारसा विचार केला जात नसल्याने खड्डेमय शहराचे चित्र ऑगस्टच्या उत्तरार्धात कायम राहिल्याची नागरिकांची भावना आहे.