जळगाव: नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले लांब चोचीचे गिधाड ३४ वर्षांनंतर जळगाव जिल्ह्यात आढळून आले. जिल्ह्यात १९९५ पूर्वी ठिकठिकाणी ही गिधाडे आढळून येत होती. यावल प्रादेशिक वनविभागातील अडावद वनपरिक्षेत्रात आढळलेले लांब चोचीचे गिधाड पूर्णपणे वाढ झालेले आहे. सुमारे ३४ वर्षांनंतर हे गिधाड आढळून आल्यामुळे वन्यजीव अभ्यासकांसह वन्यप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. हे गिधाड जागतिक स्तरावर संकटग्रस्त असून, ते शनिवारी सायंकाळी अडावद गावालगतच्या मृत जनावरांच्या अवशेषाशेजारी शेतकर्याला जखमी अवस्थेत दिसून आले. त्याच्या पंखांना दुखापत झाली होती. संबंधित शेतकर्यांनी वनविभागास त्यासंदर्भात कळविल्यानंतर यावल वनविभागाचे प्रादेशिक उपवनसंरक्षक जमीर शेख, सहायक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत साबळे यांच्यासह वनकर्मचाऱ्यांनी गिधाड ताब्यात घेतले. अडावद येथे प्राथमिक उपचारानंतर जखमी गिधाडाला नाशिक येथील पशुवैद्यकतज्ज्ञांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र चांगल्या संख्येने आढळणारी गिधाडे १९९५ नंतर दुर्मिळ होत गेली. अन्नाचे दुर्भिक्ष व जनावरांसाठी वापरल्या जाणार्या सोडियम डायक्लोफेनासारख्या वेदनाशामक औषधांच्या बेसुमार वापरामुळे त्यांची संख्या रोडावत गेली. नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या या पक्ष्यांची संख्या त्यांच्या संवर्धनासाठी अवलंबिलेल्या उपाययोजनांमुळे पुन्हा वाढत आहे, असे दिसून येत आहे.

हेही वाचा : उत्तर महाराष्ट्रातील सर्व सहा जागा महायुती जिंकणार, गिरीश महाजन यांचा दावा

सातपुड्यात गिधाडांची नोंद महत्त्वाची

लांब चोचीची गिधाडे १९९५ पर्यंत जळगाव जिल्ह्यात सर्वत्र चांगल्या संख्येने आढळत होती. नंतर हे पक्षी जिल्ह्यातून हद्दपार झाले. सातपुड्याच्या पायथ्याशी गिधाडाची ही अनेक वर्षांनंतरची नोंद महत्त्वाची मानली जात आहे. यावरून या पक्ष्याच्या वसाहती सातपुड्यातील कडे-कपारींमध्ये अजूनही शाबूत असण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यांमुळे केळीबागा आडव्या, मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान

गिधाड हे मृतोपजीवी आहेत. त्यांचे प्रमुख अन्न हे मृत झालेले प्राणी असल्याने ते सतत गावशिवाराच्या जवळपास असत. पूर्वी शेतकरी आपली जनावरे शेवटच्या क्षणापर्यंत वाढवत असत. आता भेकड जनावरे कत्तलखान्यात जाऊ लागल्याने गिधाडांच्या अन्नाचे दुर्भिक्ष्य होत गेले. त्यातच जनावरांसाठी वापरल्या जाणार्या वेदनाशामक औषध आणि इंजेक्शनचा वापर वाढू लागला. याचा परिणाम थेट गिधाडांच्या मृत्यूवर झाला. त्यांची संख्या झपाट्याने कमी होत गेली. आता तर त्यांच्या काही प्रजाती नामशेष होत आहेत; जी काही गिधाडे शिल्लक आहेत, ती जंगलातील कडे-कपारीतच. त्यामुळे जंगले वाचवली पाहिजेत. सातपुड्यातील गिधाडांच्या संवर्धनासाठी विशेष पुढाकार घेणे गरजेचे आहे.

राहुल सोनवणे (पक्षी अभ्यासक, वन्यजीव संरक्षण संस्था, जळगाव)