जळगाव – जिल्ह्यासह राज्यातील केळी उत्पादकांना कमी किमतीत रोगमुक्त आणि दर्जेदार टिश्युकल्चर (उतिसंवर्धित) रोपे पुरविण्यासाठी केंद्र सरकारकडून यावल तालुक्यात प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून सुमारे ५० एकर सुपीक शेती भाडेपट्ट्यावर घेण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी हिंगोणा (ता.यावल) येथे भेट देऊन प्रस्तावित प्रकल्पाच्या जागेची पाहणी केली.
केंद्रीय कृषी मंत्रालयाने जळगाव जिल्ह्यात केळीसाठी समूह विकास केंद्र (क्लस्टर) स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे आगामी काळात केळी निर्यातीलाही आता वेग येणार आहे. भुसावळ येथून थेट रेल्वेमार्गे मुंबईतील जेएनपीटी बंदरापर्यंत केळीची वाहतूक सुलभ करण्यासाठी २०० ते २५० कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात येत आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा सविस्तर अहवाल केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाला असून, सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर त्याची अंमलबजावणी होणार आहे.
दरम्यान, केळी उत्पादनाचा दर्जा व उत्पादकता वाढवण्यासाठी टिश्युकल्चर रोपांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न केंद्र सरकारच्या मदतीने काही दिवसांपासून सुरू झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार रोपे मिळाल्याने उत्पादन वाढणार असून, निर्यातक्षम गुणवत्तेची केळी उपलब्ध होणार आहे. प्रस्तावित प्रकल्पाकरीता भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेड (बीबीएसएसएल) या राष्ट्रीय स्तरावरील बहु-राज्य सहकारी संस्थेच्या तांत्रिक मूल्यांकन समितीने यावल तालुक्यातील हिंगोणा येथे असलेल्या शेत जमिनीची (गट क्रमांक २२४) निवड केली आहे.
बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गालगत काळी कसदार, सुपीक आणि पाणी साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असणारी सुमारे २० हेक्टर (५० एकर) सरकारी जमीन बीबीएसएसएल दीर्घकालीन नाममात्र भाडेपट्टा करारावर (३० ते ५० वर्षे) घेण्यास तयार आहे. या जमिनीची पाहणी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रावेर-यावलचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्यासह स्थानिक भाजप पदाधिकारी आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत केली.
केळी टिश्युकल्चर केळी रोप निर्मिती केंद्राची सुविधा जळगावसह महाराष्ट्रातील इतर भागांमधील केळी उत्पादक शेतकरी आणि सहकारी संस्थांच्या गरजा पूर्ण करेल. परवडणाऱ्या किमतीत रोगमुक्त, जास्त उत्पादन देणारी केळीची रोपे तयार करण्यासाठी सदर संस्था काम करेल, अशी आशा मंत्री रक्षा खडसे यांनी व्यक्त केली. जळगाव जिल्ह्यात टिश्युकल्चर केळी रोपांची निर्मिती व्हावी यासाठी मंत्री खडसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय सहकार व गृहमंत्री मंत्री अमित शहा आणि कृषिमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्याकरिता सहकार्य केले.