नंदुरबार : जिल्ह्यातील धडगाव येथे आयोजित शिवसेना शिंदे गटाच्या आदिवासी मेळाव्यात जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दोन मंत्री आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासमोरच भाजपचे मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या गटाविरोधात उघड नाराजी व्यक्त केली. महायुतीचा उमेदवार शिवसेनेशी प्रामाणिक नसेल तर त्यास मदत करायची की नाही याचा विचार करावा लागेल, असा इशारा देत थेट अप्रत्यक्ष विद्यमान खासदार डॉ. हिना गावित यांच्या उमेदवारीला विरोध केला. त्यामुळेच जिल्ह्यातील शिंदे गट आणि भाजप यांच्यातील वाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडण्याचे आश्वासन मंत्री दादा भुसे यांना द्यावे लागले.

मेळाव्यात शिवसेना उपनेते खासदार शिंदे यांचे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एक किलो चांदीचा धनुष्यबाण देवून स्वागत केले. मेळाव्याला उद्योग मंत्री उदय सामंत आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (उपक्रम) दादा भुसे उपस्थित होते. मेळाव्यात प्रारंभी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी थेट भाजपचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित हे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना हेतूपुरस्सर अनेक योजनांपासून वंचीत ठेवत असल्याचा पाढा वाचला. मंत्री भुसे यांनी, मेळाव्यातील उपस्थिती बघता विधानसभा निवडणुकीत धडगावमधून शिवसेने उमेदवाराचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला.

हेही वाचा…नंदुरबार : श्रीकांत शिंदे यांनी दादा भुसे, उदय सामंत यांना हेलिकॉप्टरमधून उतरविले, कारण…

जिल्ह्यातील स्थलांतर रोखण्यासाठी बांधापर्यंत पाणी पोहचवून सिंचन क्षेत्र वाढवण्याची गरज त्यांनी मांडली. शिवसैनिकांची भाजपविरोधी खदखद थेट वरिष्ठ पातळीवर मांडून यावर तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. उद्योग मंत्री सामंत यांनी, वाढदिवासाला देखील समाजपयोगी कामे करा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा संदेश असल्याचे सांगितले. खासदार शिंदे यांनी, महाराष्ट्राच्या इतिहासात दिवसरात्र काम करणारा मुख्यमंत्री कोणी असेल तर एकनाथ शिंदे असल्याचे सांगितले. उध्दव ठाकरेंच्या सभांना आता गर्दीच होत नसल्याने आठवडे बाजाराच्या दिवशी गर्दीसाठी सभा घ्यावी लागत असल्याची नामुष्की त्यांच्यावर आल्याचे शिंदे यांनी नमूद केले.

हेही वाचा…नाशिक : ग्रामीण भागात लुटमार करणाऱ्या तीन जणांना पोलीस कोठडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्र्यांप्रमाणेच त्वरीत निर्णय घेण्याचे धोरण खासदार श्रीकांत शिंदे यांनी राबविल्याचे दिसून आले. व्यासपीठावर धडगाव नगरपरिषदेच्या इमारत बांधकामासाठी आठ कोटीच्या निधीची मागणी नेत्यांनी केली होती. मुंबईला पोहचण्याच्या आत याविषयी निर्णय निघेल, असे आश्वासन शिंदे यांनी दिले. मेळाव्यानंतर जेवण करुन निघण्याचा आतच मुंबईहून सदरच्या कामाच्या मंजुरीचा आदेश त्यांनी पत्रकारांना दाखवला.