शिवसेना उपनेते खासदार श्रीकांत शिंदे यांच्या भावनिक व्यक्तिमत्वाची चुणूक गुरुवारी धडगावकरांनी अनुभवली. शिवसेनेच्या आदिवासी मेळाव्यासाठी हेलिकॉप्टरने आलेल्या खासदार शिंदे यांनी धुळे येथे निघण्यापूर्वी हेलिकॉप्टर पाहण्यास आलेल्या काही आदिवासी विद्यार्थ्यांना थेट हेलिकॉप्टरमधून फेरफटका मारला. सोबतच्या दोन मंत्र्यांना यामुळे हेलिकॉप्टरमधून थोडावेळ उतरण्याची विनंती शिंदे यांनी केली.
हेही वाचा >>> नाशिक : ग्रामीण भागात लुटमार करणाऱ्या तीन जणांना पोलीस कोठडी
नंदुरबारच्या आदिवासीबहुल भागात हेलिकॉप्टर प्रत्यक्ष पाहावयास मिळणे विशेष आहे. त्यामुळेच आदिवासी बांधव तालुक्य़ातील कुठल्याही ठिकाणी हेलिकाॅप्टर उतरणार असेल तर पाहण्यासाठी मोठी गर्दी करतात. गुरुवारी धडगावमध्ये आलेल्या खासदार शिंदे यांनी चक्क आदिवासी चिमुकल्यांची हौस पूर्ण करत त्यांना हेलिकॉप्टरमधून फिरवून आणले.
हेही वाचा >>> भिशीचे आमिष जळगावातील १३ महिलांना पडले महागात
नंदुरबार दौरा आटोपून धुळ्याकडे रवाना होण्यासाठी निघालेल्या शिंदे यांना हेलिपॅडवर काही चिमुकले हेलिकॉप्टर उत्सुकतेने पाहताना दिसले. त्यांनी लगेच आपल्या बरोबर असलेले मंत्री दादा भुसे आणि उदय सामंत यांना विनंती करुन हेलिकॉप्टरमधून उतरवून थोडा वेळ खाली थांबण्याची विनंती केली. शिंदे यांनी मंत्र्यांना का उतरवले, हे इतरांना समजेना. त्यानंतर सहा चिमुकल्यांना शिंदे यांनी हेलिकॉप्टरमध्ये बसवून उड्डाण केले. काही वेळाने पुन्हा हेलिपॅडवर त्यांना सोडले. यावेळी मंत्री भुसे यांनी सर्व मुलांना चॉकलेट दिले. त्यानंतर सर्व मंत्री आणि खासदारांनी धुळ्याकडे उड्डाण केले. धडगावमध्ये खासदार शिंदे यांनी आदिवासी चिमुकल्यांना घडवलेल्या हेलिकॉप्टर फेरफटक्याची चर्चा चांगलीच रंगल्याचे पाहण्यास मिळाले.