नाशिक – मनपासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतपत्रिकेवर मतदान घ्यावे, रस्तेे खड्डेु मुक्त करून वाहतुकीच्या समस्या दूर कराव्यात, मनपा शाळेत शिक्षक व सुविधा पुरवून शिक्षणाचा दर्जा उंचावण्यात यावा, आदी मागण्यांसाठी प्रागतिक पक्ष आणि विविध संघटनांच्या संयुक्त समितीच्यावतीने महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी महावितरणकडून सक्तीने बसवल्या जाणाऱ्या स्मार्ट टीओडी मीटरकडे लक्ष वेधण्यात आले.

माकपचे डॉ. डी. एल. कराड, राजू देसले, ॲड. प्रभाकर वायचळे, विजय बागूल, प्रफुल्ल वाघ यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथून मोर्चेकरी महापालिकेवर धडकले. निवेदनातून विविध प्रश्न सोडविण्याची मागणी करण्यात आली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतपत्रिकेवर मतदानाचा आग्रह धरण्यात आला. मतदार याद्या १०० टक्के दुरुस्त कराव्यात, रस्ते खड्डेमुक्त करून वाहतुकीची समस्या सोडवावी, मनपाच्या रुग्णालयांत डॉक्टर, नर्स व कर्मचारी कायमस्वरूपी नेमावेत, उपकरणे कार्यान्वित करावीत अशी मागणी करण्यात आली. झोपडपट्टीवासियांना विस्थापित करण्याऐवजी चांगली घरे बांधावीत. महापालिकेत गरजेनुसार भरती करावी. कंत्राटी व मानधनावरील कर्मचाऱ्यांना कायम करावे. शेकडो कोटी खर्च करून तयार केलेला गोदापार्क सुरु करावा, क्रीडांगणे व बगिचे व्यवस्थित करावेत. कुंभमेळ्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून किमान १०,००० कोटी रुपये निधी उपलब्ध करून घ्यावा. मनपातील विविध कामांतील गैरव्यवहार व भ्रष्टाचार थांबवावा, शासनाने घेतलेला कामगारांचा १२ तासांचा कामकाजाचा निर्णय रद्द करावा, आदी मागण्या करण्यात आल्या.

महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी नसल्यामुळे शहरातील समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण, आरोग्यसेवा, स्वच्छता, कर्मचाऱ्यांची कमतरता यांसारख्या प्रश्नांवर सत्ताधारी मौन बाळगून असल्याचा आरोप नेत्यांनी केला. मोर्चात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आप, संभाजी ब्रिगेड, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच, मानवता बहुउद्देशीय सामाजिक संस्था, मानव उत्थान मंच, लोकधारा सर्वोदय परिवार यांसह विविध संघटनांचा सहभाग होता.

मोर्चातून महावितरणच्या स्मार्ट टीओडी मीटरच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आले. महावितरणने खासगी ठेकेदारामार्फत जबरदस्तीने स्मार्ट टीओडी मीटर जोडणी सुरू केली आहे. यामुळे ग्राहकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत आहे. ग्राहकांची परवानगी न घेता खासगी कंपनीचे लोक स्मार्ट टीओडी मीटर बसविण्यासाठी दादागिरी करीत असून ही संपूर्ण प्रक्रिया त्वरित थांबविण्याची मागणी यापूर्वी महावितरण कंपनीकडे करण्यात आली. जबरदस्तीने बसवले जाणारे स्मार्ट मीटर काढून पूर्वीचे जुने मीटर बसवावेत, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.