नाशिक – शहरातील खड्ड्यांबाबत खूप तक्रारी येतात. कायदा व सुव्यवस्थेची वेगळी स्थिती नाही. कोण कुठे कोयता तर, कुठे बंदूक अशा अनेक गोष्टी आहेत. ज्या विभागांवर याची जबाबदारी आहे, त्यांनी काळजी घ्यायला हवी. त्यांच्या कारभाऱ्यांनी लक्ष द्यायला हवे. अन्यथा आगामी निवडणुकीत याचा लाभ विरोधी पक्षांना मिळू शकतो, असे मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी यांनी व्यक्त केले.

शहरातील गुन्हेगारीचा उंचावणारा आलेख, अमली पदार्थांची विक्री, महिलांवरील अत्याचार, छेडछाडीचे प्रकार, खड्डेमय रस्ते, अपुरा पाणी पुरवठा आदी प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी १२ सप्टेंबर रोजी मनसे आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्यावतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. दोन्ही पक्षांकडून एकत्रितपणे काढण्यात येणारा राज्यातील हा पहिलाच मोर्चा ठरणार आहे.

कायदा व सुव्यवस्था, खड्डेमय रस्ते, पावसाळ्यात काही भागात पाणी टंचाईची स्थिती अशा अनेक प्रश्नांनी नागरिक त्रस्त आहेत. शहरात खून, महिला छेडछाडीचे प्रकार घडत आहेत. अमली पदार्थांचे शाळा, महाविद्यालय परिसरात जाळे आहे. तरुणाई ऑनलाईन गेमच्या आहारी गेली आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याचा आरोप मनसे-ठाकरे गटाकडून होत आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांनी कायदा व सुव्यवस्थेसह नागरी समस्यांना प्राधान्य देऊन मोर्चाची जय्यत तयारी सुरू केली आहे.

या संदर्भातील प्रश्नावर महायुती सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी विरोधी पक्षांनी आंदोलन करणे हे त्यांचे काम असल्याचे नमूद केले. निवडणूक आल्यावर त्यांनी ते निश्चितपणे करायला पाहिजे. पोलीस, महानगरपालिकेने काळजी घ्यायला हवी. खड्डेमय रस्त्यांच्या तक्रारी आणि कायदा सुव्यवस्थेशी संबंधित अनेक गोष्टी समोर येतात. संबंधित संस्थांच्या कारभाऱ्यांनी या प्रश्नांच्या सोडवणुकीकडे लक्ष द्यायला हवे. नाहीतर त्याचा फायदा विरोधकांना मिळू शकतो, असे भुजबळ यांनी नमूद केले.

भाजप नेते गिरीश महाजन यांनी महानगरपालिका निवडणुकीत युती झाली वा, नाही झाली तरी आमच्या १०० हून अधिक जागा निवडून येतील, असे विधान केले होते. यावर भुजबळ यांनी त्यांचे १०० आले तर, आमचे २५ नगरसेवक असतील. युती झाली तर आणखी निवडून येतील. प्रत्येक पक्ष आपले जास्तीतजास्त नगरसेवक निवडून यावेत म्हणून प्रयत्न करणार हे स्वाभाविक असल्याचे सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत लढण्याचा प्रयत्न आहे. तसे न जमल्यास पुढील समीकरणे पाहिली जातील, असे ते म्हणाले.