नाशिक – पावसाळ्यात वेगवेगळ्या कारणांनी वीज पुरवठा खंडित होतो. अशावेळी पर्यायी स्वरुपात किंवा दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करून वीज पुरवठा खंडित होण्याचा कालावधी कमीत कमी राहील याची दक्षता घ्यावी, असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिले.

नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागातील नाशिक, जळगाव, भांडूप, कल्याण, रत्नागिरी परिमंडळातील विविध कामांचा चंद्र यांनी आढावा घेतला. यावेळी सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे, संचालक सचिन तालेवार, संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार, कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे आदी उपस्थित होते.

मान्सून सक्रिय झाला असून पावसाळ्यात ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा देण्यासह ग्राहक आणि कर्मचारी यांच्या विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. त्यासाठी स्थानिक पातळीवर तत्काळ उपाययोजना कराव्यात, असे चंद्र यांनी सूचित केले. बैठकीत चंद्र यांनी फीडर मिटरिंग, नेटवर्क नियोजन, अधिक वीजहानीच्या उच्चदाब वाहिन्या, प्रधानमंत्री सूर्यघर, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०, मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्ती, नवीन वीज जोडण्या, सौरग्राम, विद्युत वाहनांचे चार्जिंग केंद्र, टीओडी मीटर आदींचा आढावा घेतला.

प्रधानमंत्री सूर्यघर योजना आणि सौरग्रामचा लाभ मिळवून देण्यासाठी महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गावोगावी प्रबोधन करावे, अशी सूचना त्यांनी केली. यावेळी सुंदर लटपटे (नाशिक), इब्राहिम मुलाणी (जळगाव), चंद्रमणी मिश्रा (कल्याण) आदींसह सर्व अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, अधिकारी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाशिक, जळगावमध्ये सर्वाधिक थकबाकी

कोकण प्रादेशिक विभागात नाशिक आणि जळगाव परिमंडळात वीज देयकांची सर्वाधिक थकबाकी आहे. त्यामुळे या दोन्ही परिमंडळांसह इतर ठिकाणी देखील थकबाकीसह चालू वीज देयकांची १०० टक्के वसुली करणे क्रमप्राप्त आहे. महावितरणच्या आर्थिक स्थैर्यासाठी वसुलीशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही. त्यामुळे वाढणारी थकबाकी ही चिंतेची बाब आहे. गेल्या दोन महिन्यांत अपेक्षित वसुली झालेली नाही. त्यामुळे थकबाकी वसुलीमध्ये कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा लोकेश चंद्र यांनी दिला.