नाशिक – त्र्यंबक राजाच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांना या नगरीत प्रवेश करण्यापासून ते वाहन उभे करणे, दर्शन, प्रसाधनगृह आदींपर्यंत कशा प्रकारे गुंडगिरी व आर्थिक पिळवणुकीला सामोरे जावे लागते, यावर शनिवारी इलेक्ट्राॅनिक प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना झालेल्या मारहाणीतून नव्याने प्रकाश पडला आहे. प्रवेश कर भरल्याशिवाय वाहन पुढे नेता येणार नसल्याची दमदाटी करीत टोळक्याने पत्रकारांना मारहाण केली. यावेळी दगड, छत्री आदींचा वापर झाला. यामध्ये तीन जण जखमी झाले.
त्र्यंबकेश्वरमध्ये शनिवारी साधू-महंत आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीचे नियोजन होेते. यासाठी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी योगेश खरे, किरण ताजणे आणि अभिजित सोनवणे हे एका वाहनातून दुपारी बारा वाजेच्या सुमारास त्र्यंबकेश्वरमध्ये पोहोचले. प्रवेशद्वाराच्या कमानीजवळ काहींनी त्यांचे वाहन रोखून प्रवेश कर देण्याची मागणी केली. कुंभमेळा बैठकीसाठी आम्ही आल्याचे त्यांनी सांगितल्यावरही वसुली करणाऱ्यांनी वाद घातला. आणखी साथीदार बोलावून टोळक्याने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना धक्काबुक्की करीत बेदम मारहाण केली. यात किरण ताजणे हे गंभीर जखमी झाले.
या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी धाव घेतली. जखमींना शासकीय रुग्णालयात नेले. प्राथमिक उपाचारानंतर ताजणे यांना नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेे. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले.
त्र्यंबकेश्वरमध्ये येणाऱ्या वाहनांकडून नगरपालिका प्रवेश कर आकारते. त्याचा ठेका देण्यात आलेल्या व्यक्तीने वसुलीसाठी गुंड प्रवृत्तीची माणसे नेमली आहेत. त्र्यंबकच्या प्रवेशद्वारावर खुर्च्या टाकून संबंधितांकडून वसुलीचे काम सुरू असते. स्थानिक वाहनधारकांची ते अडवणूक करतात. त्र्यंबकेश्वरमध्ये नातेवाईकांकडे वाहन घेऊन येणाऱ्यांचीही प्रवेश करातून सुटका होत नसल्याच्या तक्रारी आहेत.
वाहनतळ, दर्शन, प्रसाधनगृह व्यवस्थेतही लुबाडणूक
देशभरातून त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सामोरे जाव्या लागणाऱ्या अडचणी काही महिन्यांपूर्वी गुजरातमधील भाविक कांजीभाई भरवाड यांनी नाशिक जिल्हा प्रशासनासमोर मांडल्या होत्या. भाविकांची वाहन प्रवेश शुल्क, वाहनतळ, देणगी दर्शन, प्रसाधनगृह आदी व्यवस्थेत आर्थिक पिळवणूक होत असल्याची तक्रार त्यांनी केली होती. त्र्यंबकेश्वरमध्ये नगरपालिकेचे वाहनतळ आहे. त्यांची सुमारे ५०० वाहने उभी करता येतील इतकी क्षमता आहे. खासगी जागेवर ११ वाहनतळ असून तिथे एकेका वाहनधारकाकडून ३०० ते ५०० रुपये घेतले जातात. अन्य पर्याय नसल्याने भाविक खासगी वाहनतळाच्या सापळ्यात अडकतात, असे एकंदर चित्र आहे.
छगन भुजबळांकडून कारवाईची सूचना
त्र्यंबकेश्वर येथे गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून झालेल्या मारहाणीत जखमी झालेले पत्रकार किरण ताजणे यांची रुग्णालयात जाऊन मंत्री छगन भुजबळ यांनी भेट घेऊन विचारपूस केली. या घटनेचा निषेध करीत मारहाण करणाऱ्या गुंडांविरुद्ध कठोर कारवाईची सूचना पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना दिली. असे प्रकार पुन्हा होऊ नयेत तसेच येणाऱ्या सामान्य भाविकांना देखील याचा त्रास होऊ नये याबाबत दक्षता घेण्याचे आदेश दिले.