जळगाव : केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कमी खर्चात विमानाद्वारे शेतीमालाची वाहतूक सुलभ करण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. तथापि, सध्या जळगाव विमानतळावर स्वतंत्र मालवाहतूक (कार्गो) विमानसेवा उपलब्ध नसल्यामुळे केंद्राच्या योजनांचा लाभ स्थानिक शेतकऱ्यांना होत नाही. मात्र, आता विमानतळावर कार्गो टर्मिनल सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे.
शहरातील विमानतळाने राज्यातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या विमानतळाचा मान मिळवला आहे. विमानतळाच्या सेवांना आणखी गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून तांत्रिक तसेच आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी खासदार स्मिता वाघ यांनी केली होती. त्यानुसार, विमानतळाच्या विकासासाठी सुमारे ३० कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. ज्या माध्यमातून दोन एटीआर ७२ आणि एक लेगसी ६५० विमानाची पार्किंग होऊ शकेल, अशा ॲप्रनचा विस्तार केला जाणार आहे. तसेच आधुनिक सोयी सुविधांनी युक्त टर्मिनल इमारत, १५० प्रवाशी क्षमतेची बैठक व्यवस्था, टर्मिनल इमारतीसमोर १०० मोटारींचा वाहनतळ, आगमन सभागृहात प्रवाशांनी बरोबर आणलेले सामान जमा करण्यासाठी कन्व्हेयर बेल्ट, वैद्यकीय तपासणी कक्ष, अतिरिक्त चेक-इन काऊंटर, खाद्य पदार्थांची दुकाने तसेच बालसंगोपन कक्षाची निर्मिती केली जाणार आहे.
दरम्यान, केंद्र सरकारच्या ‘कृषी उडान’ योजनेत देशभरातील ५८ विमानतळांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात महाराष्ट्रातील नाशिकसह पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर आणि जळगाव या विमानतळांचीही नावे आहे. कृषी उडान योजनेमुळे शेतकरी आणि शेतीमालाच्या निर्यातदारांना हवाई मार्गाद्वारे मालाची स्वस्त, जलद आणि सुलभ वाहतूक करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. परंतु, बऱ्याच विमानतळांवर आवश्यक कार्गो टर्मिनलची सुविधा नसल्याने ही योजना राज्यात अद्याप प्रभावीपणे राबवली जाऊ शकलेली नाही. परिणामी, शेतकरी आणि शेतीमाल निर्यातदारांना अपेक्षित लाभ मिळण्यात विलंब होत आहे. येत्या काळात कार्गो टर्मिनल सुरू झाल्यास राज्यातील कृषी उत्पादनांना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी संधी उपलब्ध होऊ शकणार आहे.
सध्या जळगाव विमानतळावर देखील स्वतंत्र मालवाहतूक (कार्गो) सेवा उपलब्ध नसल्यामुळे प्रवासी विमानांद्वारे केवळ मर्यादित प्रमाणात शेतीमाल पाठविला जातो. आगामी काळात नवीन कार्गो टर्मिनल सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या केळीसह इतर शेतीमालाची निर्यात मोठ्या प्रमाणात करता येईल. त्या दृष्टीने आवश्यक त्या पातळीवर केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांनी म्हटले आहे. सध्या जळगाव विमानतळावर मालवाहतुकीचे प्रमाण अत्यल्प असून, स्वतंत्र कार्गो टर्मिनलच्या अभावामुळे ‘कृषी उडान’ योजनेअंतर्गत शेतीमालाची वाहतूक प्रत्यक्षात सुरू होऊ शकलेली नाही.
कार्गो टर्मिलनचे फायदे काय ?
जळगाव विमानतळावर स्वतंत्र कार्गो टर्मिनल सुरू झाल्यानंतर शीतगृह, गोदाम आणि जलद मालवाहतूक यांसारख्या अत्यावश्यक सुविधा उपलब्ध होऊ शकणार आहेत. शेतकऱ्यांसाठी विशेष सवलत योजना लागू करण्यात येतील, ज्यामुळे त्यांना केंद्र सरकारच्या ‘कृषी उडान’ योजनेचा थेट लाभ मिळेल. शेतकरी केळीसह इतर फळे, भाजीपाला आणि शेतीमाल कमी खर्चात हवाई मार्गाने परदेशात पाठवू शकतील. स्थानिक कृषी सहकारी संस्था तसेच भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून निर्यातदारांना आवश्यक तांत्रिक सहकार्य दिले जाईल. या सुविधेमुळे समुद्री मार्गे सध्या होत असलेल्या वेळखाऊ निर्यातीला एक जलद आणि परिणामकारक पर्याय उपलब्ध होईल.
