जळगाव – जिल्ह्यात अतिवृष्टीसह पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असताना ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफीची मागणी विरोधकांनी केली आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांविषयी आस्था दाखविण्यासाठी आधी सत्ताधारी भाजप, त्यानंतर आता राष्ट्रवादीने (अजित पवार) कर्जमाफीसह हेक्टरी ५० हजार रूपये अनुदानाची मागणी सरकारकडे केली आहे.

जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात २३ तारीख अखेर ३४ महसूल मंडळात ६५ मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद घेण्यात आली आहे. त्यामुळे कपाशी, केळी, कांदा, सोयाबीन, मका, भाजापाला व फळपिकांचे सुमारे ८० हजार हेक्टरचे नुकसान होऊन ५१८ गावांमधील एक लाखांहून अधिक शेतकरी बाधित झाले. पुराच्या पाण्यात वाहुन गेल्याने पाच जणांचा मृत्यू झाला. त्यात पाचोरा तालुक्यात तिघांचा, भुसावळ व मुक्ताईनगर प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश होता.

१९२२ पशुधन मृत्युमुखी पडले असून, १०६८ घरांची पडझड झाली. याशिवाय, ६८७ घरांत पुराचे पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले. पाचोरा तालुक्यात सर्वाधिक ५९२, एरंडोल तालुक्यात ८० आणि मुक्ताईनगर तालुक्यात १५ घरांचे नुकसान झाले होते. कृषी व महसूल विभागाकडून पिकांसह घरांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू असतानाच शनिवारी सायंकाळनंतर रविवारी सकाळपर्यंत चाललेल्या पावसाने पुन्हा तडाखा दिला आहे.

दरम्यान, पंचनाम्याचे सोपस्कार आणि निकषांचे खेळ न करता थेट ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यापूर्वीच केली आहे. निवडणूक काळात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविताना सरकारने कोणतेही कागदपत्र किंवा पात्रतेची तपासणी न करता थेट महिलांच्या खात्यात पैसे जमा केले होते. त्याच धर्तीवर शेतकऱ्यांना नुकसानीची मदत न देता पंचनामे, विविध अटी आणि कागदपत्रांच्या पडताळणीच्या नावाखाली विलंब केला जात आहे, याकडेही आमदार खडसे यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले होते.

या पार्श्वभूमीवर, भाजप किसान मोर्चाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी नुकतीच केली. त्यानंतर महायुतीचा घटक पक्ष अजित पवार गटाच्या शिष्टमंडळाने सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी प्रति हेक्टरी ५० हजार रूपये अनुदान आणि संपूर्ण कर्जमाफी देण्याविषयीचे निवेदन दिले. आमदार अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, महिला आघाडीच्या कल्पना पाटील, प्रतिभा शिंदे आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.