जळगाव – येथील जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेडला औद्योगिक यंत्रसामुग्री आणि उपकरणांच्या मोठ्या उद्योग गटातून ५६ व्या ईईपीसी इंडिया राष्ट्रीय निर्यात पुरस्काराने केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते गौरविण्यात आले. नवी दिल्लीतील विज्ञान भवनात सदरचा पुरस्कार सोहळा पार पडला.
या निमित्ताने नवीन तंत्रज्ञान कृषी क्षेत्रात विकसीत करून संशोधनाच्या क्षेत्रात लक्षणीय काम केलेल्या आणि शेतकऱ्यांच्या जीवनात मोठे परिवर्तन घडवून आणणाऱ्या जैन इरिगेशनच्या शिरोपेचात आणखी एक तुरा खोवला गेला आहे. सदर पुरस्कार जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन आणि जैन फार्मफ्रेश फुड लिमिटेडचे संचालक अथांग जैन यांनी स्वीकारला. या सोहळ्यास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख अतिथी होत्या. यावेळी वाणिज्य व उद्योग तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितिन प्रसाद, वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल तसेच ईईपीसी इंडियाचे अध्यक्ष पंकज चड्डा यांचीही उपस्थिती होती.
गेल्या दशकात जागतिक व्यापारात मोठी आव्हाने असूनही भारताच्या अभियांत्रिकी निर्यातीत ७० अब्ज डॉलर्सवरून ११५ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढ झाल्याचे राष्ट्रपती मुर्मू यांनी नमूद केले. भारतीय उत्पादकांना जागतिक बाजारपेठेशी जोडल्याबद्दल त्यांनी ईईपीसी इंडियाचे सुद्धा कौतुक केले. इंजिनिअरिंग एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया म्हणजेच ईईपीसी इंडियाची स्थापना १९५५ मध्ये भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत करण्यात आली होती.
अभियांत्रिकी निर्यातीला प्रोत्साहन देणारी ही देशातील सर्वोच्च संस्था असून, तिचे १२ हजारापेक्षा अधिक सदस्य आहेत. ज्यात लघू व मध्यम उद्योगांचाही मोठा वाटा आहे. धोरणात्मक सल्ला, बाजारपेठ विकास, खरेदीदार-विक्रेता मेळावे आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांच्या माध्यमातूनही ईईपीसी निर्यातदारांना साहाय्य करते.
दरम्यान, राष्ट्र प्रथमच्या भावनेने जागतिक व्हॅल्यू चेनमध्ये भारताचा सहभाग वाढविण्याचे तसेच जागतिक नवोपक्रम अर्थव्यवस्थेत भारताचे स्थान बळकट करण्याचे आवाहन राष्ट्रपती मुर्मू यांनी पुरस्कार वितरण सोहळ्यात केले. प्लॅटिनम जयंती कार्यक्रमानंतर ईईपीसी इंडियाने २०२३–२४ या आर्थिक वर्षातील अभियांत्रिकी निर्यातीत उत्कृष्ट कामगिरीबद्दल विविध कंपन्यांना पुरस्कार प्रदान केले. संस्थेच्या ७० व्या वर्धापन दिनाने जागतिक उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्याच्या आमच्या बांधिलकीचे प्रतीक दर्शविले आहे. हे पुरस्कार भारताच्या निर्यात वृद्धीला दिशा देणाऱ्या नवोपक्रमकर्त्यांचा गौरव करतात, असे ईईपीसी इंडियाचे अध्यक्ष पंकज चड्डा म्हणाले.
निर्यात पुरस्कार केवळ आमच्या कंपनीचा सन्मान नाही, तर भारताच्या कृषी आणि औद्योगिक प्रगतीचा गौरव आहे. आम्ही हा सन्मान देशातील शेतकऱ्यांना आणि कंपनीत महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या सहकाऱ्यांना समर्पित करतो. – अशोक जैन (अध्यक्ष- जैन उद्योग समूह, जळगाव).