जळगाव – जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव, पारोळा, एरंडोल तालुक्यांत रविवारी रात्री आणि सोमवारी सकाळी जोरदार पाऊस झाला. वरखेडीच्या एका शेतकऱ्याचा नाल्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. नद्यांच्या पुराचे पाणी पाचोरा शहरासह काही गावांमध्ये शिरल्याने घरांचे तसेच पिकांचे अतोनात नुकसान झाले. दरम्यान, राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आपत्तीग्रस्तांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.
जिल्ह्यात १५ तारखेला रात्री झालेल्या जोरदार पावसानंतर मुक्ताईनगर तालुक्यात एक शेतकरी पुराच्या पाण्यात वाहून गेला होता. तसेच पाचोरा तालुक्यातील २०० पेक्षा अधिक जनावरे आणि ट्रॅक्टर पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. जामनेर तालुक्यातही तीन जनावरे मृत्युमुखी पडली होती. नद्यांच्या काठावरील घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान बाधित नागरिकांना सोसावे लागले.
जिल्हा प्रशासनाने गेल्या आठवड्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल नाशिक विभागीय आयुक्तांकडे सादर केला. त्यानुसार, एकूण ७७ गावांतील १४ हजारांहून अधिक शेतकरी नैसर्गिक आपत्तीने बाधित होऊन ११ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे.
त्यानंतर, रविवारी रात्री आणि सोमवारी सकाळी पुन्हा पाचोरा, भडगाव, पारोळा, एरंडोल तालुक्यांना जोरदार पावसाने तडाखा दिला. लहान-मोठ्या नद्या तसेच नाल्यांना मोठे पूर आल्याने पाचोरा शहरासह परिसरातील बरीच गावे जलमय झाली. शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने कपाशी, मका, केळी या पिकांचे अतोनात नुकसान झाले.
दरम्यान, पावसामुळे नुकसान सोसणाऱ्या काही गावांना मंत्री महाजन यांनी सोमवारी तातडीने भेट देऊन निर्माण झालेल्या आपत्तीचा आढावा घेतला. शेतांच्या बांधांवर जाऊन पीक नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला तातडीने एनडीआरएफचे पथक तैनात करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पुन्हा पूरस्थिती उद्भवल्यास बाधित नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे नियोजन करण्यासही सांगितले.
अतिवृष्टीसह पुराच्या पाण्यामुळे शेती पिकांचे, रस्त्यांचे आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाला तातडीने मदतकार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या असून, शासन नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. अधिकाऱ्यांना पिकांसह घरांच्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ पूर्ण करून मदतीची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नुकसानग्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत प्रदान करण्यात येईल. शासन आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी पूर्णपणे तत्पर आहे, अशी ग्वाही सुद्धा मंत्री महाजन यांनी आपत्तीग्रस्तांना दिली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिता वाघ, पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.