जळगाव – जिल्ह्यातील मुक्ताईनगरात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या तसेच वरणगावातील अन्य एका पेट्रोल पंपांवर पडलेल्या दरोड्यातील सहा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यापैकी एक जण अल्पवयीन असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
मुक्ताईनगरात राष्ट्रीय महामार्गावर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीचा रक्षा ऑटो फ्युएल्स नावाचा पेट्रोल पंप आहे. त्या ठिकाणी गेल्या गुरूवारी मध्यरात्री दुचाकीवर आलेल्या पाच दरोडेखोरांच्या हातात गावठी बंदुका होत्या. त्यांनी पंपावरील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून मारहाण केली. केबिनमध्ये तोडफोड करत एक लाखांपेक्षा अधिक रोख रक्कम लुटून नेली.
तसेच दरोड्याचे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने दरोडेखोरांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर सोबत नेला होता. दरम्यान, आमदार एकनाथ खडसे यांनी पेट्रोल पंप दरोड्यानंतर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिघडल्याचा आरोप केला होता. राजकीय पाठबळ असल्याशिवाय गुन्हेगार एवढी हिंमत करू शकत नाही, असेही त्यांनी म्हटले होते.
केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांचीच संपत्ती सुरक्षित नसल्यावर सर्व सामान्य नागरिकांचे काय, वर्दळीच्या ठिकाणी भरवस्तीत असलेल्या पेट्रोल पंपावर रात्री अकाराच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडत असेल तर पोलीस यंत्रणा काय करत आहे, असे काही प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते.
जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांच्या कालखंडात मोठ्या प्रमाणात गावठी बंदुका, गांजा, ड्रग्ज, गुटखा, शस्त्रे आढळून आली आहेत. असले प्रकार संबंधित गुन्हेगारांना कोणाचे तरी राजकीय संरक्षण असल्याशिवाय वाढूच शकत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते. त्यानंतर पोलिसांनी पेट्रोल पंप दरोड्यातील संशयितांच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथके रवाना केली. अखेर, चार संशयितांना नाशिक येथून तर दोन संशयितांना अकोल्यातून ताब्यात घेण्यात आले. सर्व संशयितांना आता पुढील तपासकामी मुक्ताईनगर पोलिसांकडे सोपविले आहे.
सचिन भालेराव (३५, रा. भुसावळ, हल्ली मुक्काम खकनार, जि. बऱ्हाणपूर), पंकज गायकवाड (२३, रा. भुसावळ), हर्षल बावस्कर (२१), देवेंद्र बावस्कर (२३, दोन्ही रा. बाळापूर, जि. अकोला) आणि प्रदुम्न विरघट (१९, रा. कौलखेड, जि. अकोला) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. याशिवाय एक विधी संघर्षीत बालक आहे. संबंधितांकडून ४० हजार रूपये रोख, तीन गावठी बंदुका, पाच मॅगझीन, १० जीवंत काडतुसे आणि नऊ भ्रमणध्वनी जप्त करण्यात आले.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय अधिकारी संदीप गावित,यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक राहुल गायकवाड, उपनिरीक्षक शरद बागल, सोपान गोरे, शेखर डोमाळे, जितेंद्र वल्टे, रवी नरवाडे, हवालदार गोपाळ गव्हाळे, प्रेमचंद सपकाळे, उमाकांत पाटील, सलीम तडवी, श्रीकांत देशमुख आदींनी सदर कारवाई यशस्वी केली.
