जळगाव – गिरणा धरण १०० टक्के भरल्यानंतर पाटबंधारे विभागाकडून पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात आहे. या पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ते कालव्यात सोडण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने नुकतीच केली. त्यानंतर बुधवारी शिवसेनेने (उद्धव ठाकरे) पाटबंधारे विभागाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाला त्यासंदर्भात निवेदन दिले.
पावसाचा मोठा खंड पडल्याने कोरड्या दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील पिकांना जीवदान देण्यासाठी तातडीने गिरणा धरणाचे एक आवर्तन सोडण्याची मागणी शरद पवार गटाने ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून केली आहे. परंतु, संबंधित विभागाच्या अभियंता वर्गाकडून सुरू असलेली टोलवाटोलवी लक्षात घेता, १२ सप्टेंबरपर्यंत कालव्यात पाणी सोडले न गेल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शरद पवार गटाच्या वतीने देण्यात आला आहे. त्यानंतर बुधवारी ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेश पाटील, शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, धरणगावचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक देण्यात आली.
पाणलोट क्षेत्रातील जोरदार पावसानंतर गिरणा धरण १०० टक्के भरले असून, मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पाणी वाहून जात आहे. म्हणून धरणाचे पाणी थेट नदीत न सोडता जामदा तसेच दहीगाव बंधाऱ्यातून कालव्याद्वारे सोडण्याची मागणी ठाकरे गटातर्फे करण्यात आली. पावसाचा मोठा खंड पडल्याने तसेच अति पावसामुळे खरीप हंगाम वाया गेला असला, तरी रब्बीचे पीक चांगले येण्यासाठी शक्यता आहे. त्या अनुषंगाने माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष भोसले यांची समक्ष भेट घेऊन सविस्तर वाचा चर्चा करण्यात आली. त्यांनी लगेच उपकार्यकारी अभियंता तुषार राजपूत यांना दोन दिवसात कालव्याद्वारे पाणी सोडण्याची सूचना दिली.
गिरणा धरणाचे पाणी कालव्यातून सोडल्यास शेतकऱ्यांना विहीर पुनर्भरणासाठी फायदा होईल. भूजल पातळी वाढल्याने रब्बी हंगामासाठी पुरेसे पाणी मिळेल. पाटबंधारे विभागाकडून सध्या फक्त १२ हजार हेक्टरला पाणी पुरविले जाते. उर्वरित आठ हजार हेक्टरवरील शेतीला पाणी का मिळत नाही, असा प्रश्न ठाकरे गटाकडून करण्यात आला. रब्बी हंगामात पहिले आवर्तन जानेवारीला सोडतात ते डिसेंबरला सोडावे, अशी मागणी सुद्धा ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने केली. शिष्टमंडळात ठाकरे गटाचे जळगाव महानगर प्रमुख शरद तायडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. भाऊसाहेब सोनवणे, प्रशांत सुरडकर, प्रमोद घगे, राकेश घुगे, सचिन चौधरी, महेंद्र पाटील, भाऊसाहेब पाटील, दिनेश बोरसे, निलेश महाजन, चंद्रकांत शर्मा, प्रशांत परदेशी, मकबूल पठाण आदी सहभागी होते.